Nashik Crime : त्र्यंबकेश्वरला व्हीआयपी दर्शनाच्या पासचा काळाबाजार, 600 रुपयांचे पास 2 हजाराला विकले, भक्तांची लूट
Nashik Crime : त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनासाठी जास्त पैसे घेऊन खोटे तिकीट विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Crime : त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) दर्शनासाठी जास्त पैसे घेऊन खोटे तिकीट विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत मंदिर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित माचवे यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात (Trimbakeshwar Police Station) गुन्हा नोंदवला आहे.
गुजरात राज्यातील सुरत येथील भाविकासोबत हा प्रकार घडला असून, थेट दर्शनासाठी असलेल्या 200 रुपयांची तीन व्हीआयपी तिकिटे मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ भेटलेल्या एका व्यक्तीने 2 हजार रुपयांना विकली. मात्र, ही तिकिटे मंदिराच्या प्रवेशद्वारी असलेल्या संगणकीय स्कॅनिंग यंत्राने स्वीकारली नाहीत व त्यामुळे फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
600 रुपयांच्या पासची 2000 रुपयांना विक्री
त्र्यंबकेश्वर मंदिरात चिराग दालिया (रा. सुरत, गुजरात) हे सोबत दोन व्यक्तींना घेऊन दर्शनासाठी आले होते. मंदिराच्या उत्तर महाद्वारावर त्यांना एक अनोळखी व्यक्ती भेटली. त्याने शॉर्टकट व्हीआयपी दर्शन करून देतो असे सांगितले व त्याच्याजवळ असलेले त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे तीन लोकांचे प्रत्येकी 200 रुपयांप्रमाणे असे 600 रुपये किंमत असलेले व्हीआयपी तिकीट दालिया व त्यांच्या सोबत आलेल्या दोन व्यक्तींना 2 हजार रुपये घेऊन विकत दिले. सदर पास घेऊन ते व्हीआयपी दर्शनासाठी उत्तर महाद्वार येथे आले. तेव्हा ते तिकीट स्कॅनिंग करताना खोटे असल्याचे दाखवत यंत्रणेने अमान्य केले. साहजिकच सुरक्षारक्षकांनी त्यांना प्रवेश दिला नाही. संगणकीय प्रणालीमध्ये तिकिटावरील तपशील व सदर भाविकाचा आधार कार्डवरील नाव हे वेगवेगळे आहे. त्यामुळे तुमचे तिकीट अमान्य करण्यात आले असे सांगितले.
त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्याने दालिया याने ट्रस्ट कार्यालयात धाव घेतली. देवस्थान चेअरमन यांचे नावे लेखी तक्रार अर्ज दिला. त्यामध्ये तिकीट देणाऱ्या व्यक्तीचे वर्णन करण्यात आले आहे. त्या व्यक्तीचे नाव नारायण असल्याचा उल्लेख अर्जात केला आहे. वास्तविक पाहता देवस्थान ट्रस्टचे ऑनलाइन तिकीट हे अहस्तांतरणीय आहे. तरी देखील नारायण नावाच्या व्यक्तीने शॉर्टकट दर्शन देण्याचे आमिष दाखवून 200 रुपये दराचे तिकीट दोन हजार रुपयांना विकले. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले व राखून ठेवण्यात आले आहे. दिनांक 23 मार्च 2025 रोजी अमित माचवे यांनी दिलेल्या फिर्याद अर्जावरून दिनांक 15 एप्रिल रोजी फिर्याद दाखल करून घेण्यात आली आहे. याबाबत नारायण या व्यक्तीवर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा
























