नाशिक : आठवडे बाजारात भाजी खरेदी करणे एका पोलीस (Police) कर्मचाऱ्यालाच चांगलेच महागात पडले आहे. चोरट्यांनी पोलिसाचा मोबाइल लंपास करुन त्यातील यूपीआयद्वारे (UPI) 99 हजार दुसऱ्या बँकेत वळते केले. त्यानंतर 960 रुपयांची खरेदी केल्याची बाब उघड झाली आहे. सुमारे एक लाखांची फसवणूक झाल्याने संबंधित पोलिसाने देवळाली कॅम्प पोलिसात (Deolali Camp Police Station) फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञातांविरुद्ध चोरीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, देवळाली कॅम्प पोलीस वसाहतीतील रहिवाशी दिपक सखाराम सरकटे (38) हे सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाजारात भाजीपाला खरेदी करीत होते. त्यावेळी अज्ञाताने त्यांचा दहा हजार रुपयांचा मोबाइल लंपास केला.
एक लाखाची फसवणूक
त्यानंतर रात्री दहा वाजेच्या सुमारास ‘यूपीआय’द्वारे कोलकाता येथील स्टेट बँकेच्या एका खात्यात 99 हजार रुपये संशयिताने वळते केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी 960 रुपये ऑनलाइन खर्च केले. हा प्रकार लक्षात येताच सरकटे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकांकडे तपास देण्यात आला आहे.
तडीपार गुंडांकडून देशी कट्टे जप्त
तडीपार केलेला रेकॉर्डवरील गुंड मुजफ्फर ऊर्फ मज्जू मैनुद्दीन शेख हा गावठी कट्टा विकण्यासाठी जवळ बाळगून फिरत आहे, अशी खबर मिळताच गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने सापळा रचून भोई गल्ली कथडा भागात त्यास अटक केली. तसेच आणखी एका तडीपाराकडून देशी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याप्रमाणे दोघांकडून दोन गावठी कट्टे व तीन जिवंत काडतुसे असा 61 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मज्जू हा कथडा भागात फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस नाईक विशाल देवरे यांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. ही माहिती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकामार्फत सापळा रचून मज्जूस अटक करण्यात आली. त्याच्याकडून 30 हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत तडीपार गुंड आवेश ऊर्फ अव्या निसार शेख हा तडीपार असताना विनापरवाना चौक मंडई भद्रकाली परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती पोलीस नाईक विशाल देवरे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळविली असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागूल व पथकाने त्यास चौक मंडई परिसरात सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 30 हजार रुपये किमतीचा एक देशी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
आणखी वाचा