Nashik Crime : त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) साधूच्या वेशात असलेल्या एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रभाकर घोटे असे या मृत व्यक्तीचे नाव असून, तो त्र्यंबकेश्वर परिसरात फिरस्ता असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून (Police) देण्यात आली आहे. (Nashik Crime News)
या प्रकरणातील एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये साधूच्या वेशातील व्यक्तीला अज्ञात इसम मारहाण करताना दिसत आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर त्र्यंबकेश्वर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात आखाडा परिषदेतील महंतांनी आरोप केला की, दारूच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने साधूला मारहाण केली. हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे सांगत त्र्यंबकेश्वरसारख्या पवित्र ठिकाणी अशा घटना निषेधार्ह असल्याचे मत आखाडा परिषदेच्या महंतांनी व्यक्त केले आहे.
मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट, आकस्मिक मृत्यूची नोंद
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. प्रभाकर घोटे यांच्या मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या मारहाणीच्या खुणा आढळून आल्या नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर प्रभाकर घोटे यांचा मृत्यू नेमका मारहाणीमुळे झाला की इतर कोणत्या कारणाने झाला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.
साधू-संतांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये दारुबंदीची मागणी
या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमधील आखाडा परिषद आणि साधू-संतांनी त्र्यंबकेश्वरमध्ये दारुबंदी करण्याची मागणी केली आहे. त्र्यंबकेश्वर येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, भाविकांना अनेकदा मद्यपींच्या त्रासाला सामोरे जावे लागते, असे साधू-संतांनी म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या