Continues below advertisement

Nashik Crime News: नाशिक (Nashik) जिल्ह्यातील नांदगाव (Nandgaon) तालुक्यातील हिसवळबेजगाव रस्त्यावर शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा हात धरून गैरकृत्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या प्रकरणी साधूवेशातील दोन इसमांविरुद्ध नांदगाव पोलीस ठाण्यात (Nandgaon Police Station) गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी सोमवारी (दि.05) सकाळी साडेनऊच्या सुमारास आपल्या मैत्रिणीसोबत पायी शाळेत जात होती. त्या वेळी जाधव वस्ती परिसरात, हिसवळ बाजूकडून मोटारसायकलवर आलेले साधूसारखे भगवे वस्त्र परिधान केलेले दोन इसम मुलींकडे पाहत पुढे गेले. काही अंतर गेल्यानंतर या इसमांनी मोटारसायकल परत फिरवून पुन्हा मुलींच्या दिशेने येत रस्त्यावर गाडी उभी करून त्यातील एक खाली उतरला.

Continues below advertisement

Nashik Crime News: मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...

हे पाहून दोन्ही मुली घाबरून हिसवळच्या दिशेने धावू लागल्या. त्यावेळी तो इसम त्यांच्या मागे धावला. धावता धावता एक मुलगी थकून थांबली असता, त्या इसमाने तिचा हात पकडून ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिच्या मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला व तिचा हात धरून पळवून नेल्याने तो इसम घाबरून तेथून पसार झाला. त्याच वेळी गावातील मच्छिंद्र खाडे हे मोटारसायकलवरून येत असल्याने मुली त्यांच्या गाडीवर बसून हिसवळ येथील शाळेजवळ उतरल्या.

Nashik Crime News: दोघांवर गुन्हा दाखल

भीतीमुळे त्यांनी तात्काळ घटना कुणालाही सांगितली नाही. नंतर त्या मुलींनी आपल्या वडिलांना फोन करून प्रकार सांगितला. त्यानंतर शाळेत मुख्याध्यापकांना माहिती दिल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने बेजगाव परिसरात या दोन्ही इसमांना पकडण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन चौकशी केली असता आरोपींची नावे सुरेश तुकाराम जगताप (रा. गोसावीवाडी, दत्तनगर, पहुरकसबे, ता. जामनेर, जि. जळगाव ) आणि नारायण दादाराव शिंदे (रा. बाबरनगर, अंबड, ता. अंबड, जि. जालना) अशी असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने नांदगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष बहाकर करीत आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Nashik Crime News : दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!

Mumbai Crime News: घरात प्रचार करण्यास विरोध; शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून दोघांना लाथा-बुक्क्यांसह पक्षाच्या झेंड्यांनी मारहाण, कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल