Nashik Crime News: नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
Nashik Crime News: विष प्राशन केल्यानंतर दिपाली यांनी स्वतः गाडी चालवत गाठले रुग्णालय मात्र पतीने रुग्णालयाच्या पायऱ्यांवरच दिपालीला सोडून पळ काढला.

नाशिक: नाशिकमध्ये एक अत्यंत मन सुन्न करणारी आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पोलीस दलात कार्यरत असलेल्या पतीकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला आणि चारित्र्याच्या संशयाला (Nashik Crime News) कंटाळून एका विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. विष प्राशन केल्यानंतर या महिलेने स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठले, मात्र पतीने उपचारासाठी डिपॉझिट न भरता तिला रुग्णालयाच्या पायऱ्यांवरच सोडून पळ काढल्याचा धक्कादायक आरोप झाला आहे. या घटनेमुळे नाशिक पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली असून सातपूर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Nashik Crime News)
दीपाली अनिल पवार (वय ३२, रा. क्लासिक निकेतन अपार्टमेंट, महात्मानगर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. त्या जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका (नर्स) म्हणून कार्यरत होत्या. या प्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ लिपिक असलेला संशयित पती अनिल पवार याला पोलिसांनी अटक केली असून, नाशिक न्यायालयाने त्याला ९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.(Nashik Crime News)
Nashik Crime News: फ्लॅट दिराच्या नावावर करण्यासाठी दबाव
मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली यांनी स्वतःच्या कमाईतून अहिल्यानगर येथे एक फ्लॅट खरेदी केला होता. हा फ्लॅट दीर सुनील याच्या नावावर करण्यासाठी पती आणि सासरचे मंडळी त्यांच्यावर सातत्याने दबाव आणत होते. त्रासाला कंटाळून अखेर दीपाली यांनी विष प्राशन केले. विष घेतल्यावर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी धैर्याने स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठले. मात्र क्रूरतेची हद्द म्हणजे संशयित पतीने उपचारासाठी लागणारे पैसे भरण्यास साफ नकार दिला आणि गंभीर अवस्थेत असलेल्या दीपाली यांना जिल्हा रुग्णालयाच्या पायऱ्यांवर सोडून तिथून पळ काढला.
Nashik Crime News: चारित्र्यावर संशय अन् एटीएम कार्डही हिसकावले
पती अनिल हा सुरुवातीला एसआरपीएफ (SRPF) दौंड येथे आणि सध्या नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत आहे. अनिलने दीपाली यांच्या पगाराचे एटीएम कार्ड स्वतःकडे ठेवून सर्व पैसे काढून घेतले होते. जेव्हा दीपाली यांनी आपल्या ७ वर्षांच्या मुलाच्या शिक्षणासाठी पगाराचे कार्ड परत मागितले, तेव्हापासून त्यांचा छळ अधिकच वाढला. कामाच्या ठिकाणाहून फोन आल्यास पती त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना बेदम मारहाण करत असे. या त्रासाला कंटाळून त्यांनी यापूर्वी कौटुंबिक हिंसाचाराची तक्रारही दाखल केली होती.





















