Nashik Crime News: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर (trimbakeshwar Temple) संस्थानमध्ये देवदर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक लूट केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष आणि मंदिर संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलगला (Purushottam Kadlag) नाशिक पोलिसांनी (Nashik Police) अटक केली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात आणि मंदिर प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
Nashik Crime News: नेमके प्रकरण काय?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर मंदिरात 'व्हीआयपी' दर्शनाच्या नावाखाली भाविकांकडून पैसे उकळल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. 11 एप्रिल रोजी नाशिकच्या पंचवटी भागातील भाविक अनंता सुरेश मेहंदळे आणि त्यांचे मित्र दर्शनासाठी आले होते. त्यांनी 200 रुपयांचा अधिकृत देणगी पास घेतला होता, मात्र रांगेत उभे असताना संशयितांनी त्यांना गाठले.
Nashik Crime News: 3 हजार रुपयांची मागणी
"रांगेतून दर्शनाला 4-5 तास लागतील, आम्ही 10 मिनिटांत दर्शन घडवून देतो," असे आमिष दाखवून संशयितांनी या भाविकांकडून 3 हजार रुपये रोख स्वीकारले. देवस्थान ट्रस्टची कोणतीही अधिकृत 'पेड दर्शन' सुविधा नसतानाही, भाविकांना आत सोडून त्यांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अनंता मेहंदळे यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
Nashik Crime News: पुरुषोत्तम कडलगच्या पुतण्यावरही गुन्हा
या प्रकरणात पोलिसांनी सर्वात आधी गोटीराम मनाजी पेहरे आणि अभिषेक कडलग (पुरुषोत्तम कडलगचा पुतण्या) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. गोटीरामला तात्काळ अटक करण्यात आली, तर अभिषेक कडलग सध्या फरार आहे. तपासादरम्यान या संपूर्ण रॅकेटमध्ये विश्वस्त पुरुषोत्तम कडलगचा सहभाग असल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले, यानंतर सोमवारी रात्री पुरुषोत्तम कडलगला अटक करण्यात आली.
Nashik Crime News: सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी प्रवेशासाठी कडक नियम आहेत. सुरक्षारक्षक कोणालाही थेट प्रवेश देत नाहीत; त्यासाठी विश्वस्तांची परवानगी किंवा फोन आवश्यक असतो. नोंदवहीमध्ये भाविकाचे नाव, कोणाच्या सांगण्यावरून प्रवेश दिला याची सविस्तर नोंद करणे बंधनकारक असते. "एवढी काटेकोर व्यवस्था असताना बाहेरील व्यक्ती भाविकांना थेट मंदिरात कशी नेऊ शकतात?" असा सवाल उपस्थित केला जात होता. आता खुद्द विश्वस्तालाच अटक झाल्याने, या भ्रष्टाचाराचे मूळ थेट संस्थानच्या आतपर्यंत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Nashik Crime News: काय म्हणाले नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक?
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील म्हणाले की, त्र्यंबकेश्वर याठिकाणी देशविदेशातून भाविक येतात. 200 रुपये व्हिआयपी दर्शनासाठी ट्रस्ट फी आहे. त्यात तत्काळ दर्शन व्हावं यासाठी यासाठी काही एजंट काम करत होते. 3 हजार ते 12 हजार रुपये घेत होते, असे आम्हाला कळले. मंदिर समितीचे अध्यक्ष आणि न्यायाधीश यांच्याकडून कारवाईचे आदेश मिळाले होते. आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं. भाविकांना कसे 3000 रुपये घेऊन लुटले जाते याचे सगळे रेकॉर्डिंग केले. काल रात्री मंदिर समितीचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांना अटक झाली आहे. संपूर्ण रॅकेटमध्ये वेगवेगळे लोक आहेत. पूर्व दरवाजातून ट्रस्टच्या अधिकाराचा वापर करून पैसे घेतलेल्या भाविकांना सोडलं जात होतं. आणखी काही ट्रस्टी असतील तर चौकशी केली जाईल. तुम्हाला 3 ते 4 तास लागतील, 10 मिनिटात दर्शन हवे असेल तर पैसे द्यावे लागतील असे सांगितले जात होते. 100 ते 150 लोक सोडले जात होते. कोणाच्या माध्यमातून या लोकांना सोडले याचा देखील तपास सुरू आहे. विश्वस्तांचे 2 नातेवाईक आणि 1 एजंट अटकेत आहे. या व्यतिरिक्त काही लोक आहेत, त्याची चौकशी सुरू आहे. ज्यांनी विश्वस्तपदाचा गैरवापर केला, त्या सगळ्यांची चौकशी होणार आहे. जे पुरावे आहेत ते न्यायालयासमोर ठेवले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
आणखी वाचा
