Nashik Crime Suicide news:नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात हुंड्यासाठी होणाऱ्या छळाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाघाळे गावातील 25 वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या (Suicide news) केल्याची घटना घडली आहे. वैशाली नामदेव नवले असे मृत विवाहितेचे नाव असून, जून 2023 मध्ये तिचा विवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर काही महिन्यांतच पती, सासरा आणि सासूकडून चारचाकी गाडी आणि शेतीसाठी माहेरून तीन लाख रुपये आणण्याचा (Dowry) दबाव टाकण्यात येत होता. या सततच्या त्रासाला कंटाळून वैशाली नवले यांनी घरासमोरील शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मृत विवाहितेचे वडील शरद निकुळे यांच्या फिर्यादीवरून येवला तालुका पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती नामदेव नवले आणि सासरा रुस्तुम नवले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे वाघाळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहेत. (Maharashtra Crime news)
Nagpur Murder news: नागपूरमध्ये डबर मर्डर
नागपुरात सक्करदरा पोलीस स्टेशन अंतर्गत छोटा ताजबाग रोडवर दोघांची हत्या करण्यात आली आहे. काल रात्री ही घटना घडली. आदित्य भोंडवे 25 वर्ष आणि आदित्य राहुलकर 23 वर्ष अशी मृतांची नावे आहे. हल्लेखोरांनी आदित्य भोंडवे आणि आदित्य राहुलकर या दोघांना सत्य दरबार बँड पार्टीच्या कार्यालय समोर घेरले आणि फळ कापण्याच्या चाकूने वार करत आणि नंतर दगडांनी ठेचून त्यांची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपी आणि मृतक हे गुन्हेगारी पार्श्वभूमीची असून त्यांच्यातील जुन्या वैमन्यातून ही घटना घडली आहे.
Pune Crime: पुण्यातील सहकारनगरमध्ये गोळीबार, एकजण गंभीर जखमी
पुण्यातील सहकार नगर भागात असलेल्या शिंदे हायस्कूलच्या परिसरात गोळीबाराची घटना घडल्याचे समोर आले आहे. बुधवारी रात्री दहा वाजून दहा मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. एका दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी एका मेडिकलच्या बाहेर थांबलेले असलेल्या व्यक्तीवर त्यांच्या पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. या घटनेत संबंधित तरुण जखमी झाला असून त्याच्यावर जवळील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणात पोलिसांनी आदित्य थोपटे याच्यासह चौघांना अट केली आहे. ही घटना पूर्ववैमन्यसातून घडल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
आणखी वाचा
