Nashik Crime News: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार (MLA) हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांचे पुत्र वामन हिरामण खोसकर यांच्यावर शिवसेना (शिंदे गट) त्र्यंबकेश्वर तालुकाप्रमुख रविंद्र भोये यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी रविंद्र भोये यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांकडे (Nashik Rural Police) लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे महायुतीतील (Mahayuti) राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Continues below advertisement

वामन हिरामण खोसकर यांचा कथित शिवीगाळ आणि धमकीची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मात्र, या क्लिपची एबीपी माझा पुष्टी करत नाही. तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपांची पोलिसांकडून चौकशी झाल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

Nashik Crime News: आमदार पुत्राने धमकी दिल्याचा आरोप

रविंद्र भोये यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत आमदार हिरामण खोसकर आणि त्यांचे पुत्र वामन हिरामण खोसकर यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वामन खोसकर यांनी आपल्याला शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भोये यांनी केला आहे.  भोये यांच्या म्हणण्यानुसार, त्र्यंबकेश्वर तालुक्यात (Trimbakeshwar) सुरू असलेल्या कथित गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराविरोधात आपण आवाज उठवत असल्याने आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

Continues below advertisement

“आमदाराचे अधिकारी असताना आमदार पुत्र बैठका घेऊन ग्रामसेवकांना धमकी देतात. मला मदत करू नये म्हणून त्रास दिला जातो," असा आरोप रविंद्र भोये यांनी केला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करत या प्रकरणाविरोधात आपण आवाज उठवत असल्याचेही भोये यांनी म्हटले आहे. आपला आवाज दाबण्यासाठी वामन खोसकर यांच्याकडून धमक्या दिल्या जात असल्याचा त्यांचा दावा आहे.

NCP vs Shiv Sena: राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेनेतील वाद पुन्हा समोर

दरम्यान, हिरामण खोसकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, तर रविंद्र भोये हे शिवसेना शिंदे गटाचे त्र्यंबकेश्वर तालुकाप्रमुख आहेत. राज्यात दोन्ही पक्ष महायुतीचा भाग असताना स्थानिक पातळीवरून समोर आलेल्या या आरोपांमुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत. या प्रकरणात रविंद्र भोये यांनी आमदार हिरामण खोसकर आणि त्यांचे पुत्र वामन खोसकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलीस या तक्रारीवर काय भूमिका घेतात आणि पुढील तपासात काय निष्पन्न होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Devendra Fadnavis and Sharad Pawar: 5 वर्षात 36 हजार कंपन्या बंद, शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे उत्तर; आकडेवारी मांडत म्हणाले, 'बंद होणाऱ्या 76 टक्के कंपन्या...'