Nashik Crime News:नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका माजी विद्यार्थ्याने (Former Student) स्वतःच्याच महिला प्राध्यापिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचा ऑनलाईन छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खासगी व्हिडीओ आणि चॅट्स व्हायरल करण्याची धमकी देत 5 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या या संशयित आरोपीला गंगापूर पोलिसांनी (Gangapur Police) अटक (Arrest) केली आहे.
Nashik Crime News: विश्वास संपादन करून प्रेमाच्या जाळ्यात ओढले
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित चेतन राजाराम आढे ऊर्फ राठोड (अंबड, जालना) हा पीडित महिला प्राध्यापिका कार्यरत असलेल्या महाविद्यालयात पूर्वी शिक्षण घेत होता. काही कालावधीनंतर प्राध्यापिकेची दुसऱ्या महाविद्यालयात बदली झाली, तरीही चेतनने त्यांच्याशी संपर्क सुरूच ठेवला. हळूहळू विश्वास संपादन करून त्याने प्राध्यापिकेला प्रेमसंबंधात ओढले. या कालावधीत त्याने प्राध्यापिकेचे खासगी स्वरूपाचे व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्ड करून घेतले असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
Nashik Crime News: 8 दिवसांच्या सहलीला नकार दिल्याने 5 लाखांची खंडणी
काही दिवसांपूर्वी संशयित चेतनने प्राध्यापिकेवर महाराष्ट्राबाहेर तब्बल आठवडाभराच्या सहलीसाठी सोबत येण्याचा दबाव टाकला. मात्र, प्राध्यापिकेने या सहलीला जाण्यास स्पष्ट नकार दिला. या नकाराने चिडलेल्या आरोपीने आपले खरे रूप दाखवत प्राध्यापिकेचे खासगी व्हिडिओ आणि चॅट्स सोशल मीडियावर सार्वजनिक करण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता त्याने या बदनामीची धमकी देऊन 5 लाख रुपयांची मागणी केली.
Nashik Crime News: बहीण आणि वहिनीलाही पाठवले संदेश
प्राध्यापिकेने पैसे देण्यास ठाम नकार दिल्यानंतर आरोपीने त्यांचा मानसिक छळ सुरू केला. संशयिताने प्राध्यापिकेच्या बहीण आणि वहिनीलाही अश्लील व धमकीचे मेसेज पाठवून दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्रासाला कंटाळून पीडित महिला प्राध्यापिकेने गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) धाव घेत तक्रार दाखल केली.
Nashik Crime News: गुन्हा दाखल; आरोपीला अटक
प्राध्यापिकेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपी चेतन आढे ऊर्फ राठोड याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
