Nashik Crime News: नाशिक शहरातील गंगापूररोडवरील (Gangapur Road) ध्रुवनगर परिसरात एका 21 वर्षीय दिव्यांग युवतीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी तिने आपल्या तळहातावर ‘आय लव्ह यू मॉम-डॅड’ असे लिहिल्याचे शवचिकित्सेदरम्यान उघडकीस आल्याने ही घटना अधिकच भावूक करणारी ठरली आहे.
दीक्षा दत्तू त्रिभुवन (वय 21, रा. शिल्पा आनंदवन, क्रीडांगणाजवळ) असे मृत युवतीचे नाव आहे. दीक्षा ही जन्मतःच दिव्यांग होती. मात्र स्वभावाने अत्यंत शांत, संयमी आणि अभ्यासू असलेली दीक्षा कुटुंबीयांसाठी आशेचा किरण मानली जात होती. ती शहरातील एका दिव्यांग विद्यालयात शिक्षण घेत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Nashik Crime News: ‘आय लव्ह यू मॉम-डॅड’
रविवारी सायंकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास दीक्षाने आपल्या राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलले. कुटुंबीयांच्या हे लक्षात येताच तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेतील सर्वात हळहळजनक बाब म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी दीक्षाने आपल्या तळहातावर ‘आय लव्ह यू मॉम-डॅड’ असा भावनिक संदेश लिहिला होता. शवविच्छेदनादरम्यान ही बाब समोर येताच कुटुंबीयांचा अश्रूंचा बांध फुटला.
Nashik Crime News: आत्महत्येचे कारण अस्पष्ट
या निरोपामुळे दीक्षाच्या मनातील अस्वस्थता आणि अंतर्गत वेदना प्रकर्षाने जाणवत असल्या, तरी तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. दिव्यांग असूनही जिद्दीने शिक्षण घेणाऱ्या आणि भविष्यासाठी झटणाऱ्या दीक्षाचे अकाली जाणे परिसरातील नागरिकांनाही चटका लावून गेले आहे. दीक्षाच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार असून तिघेही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. या प्रकरणाचा तपास गंगापूर पोलीस ठाण्याचे हवालदार चंद्रकांत पाटील करत असून, आत्महत्येच्या कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
