Kasara Car found in Bushes with dead bodies: शहापूर तालुक्यातील उंबरमाळी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबई–नाशिक महामार्गावरील नाल्यात झाडाझुडपांमध्ये पडलेल्या एका कारमधून तीन मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. ही कार अंदाजे चार ते पाच दिवसांपूर्वी अपघातग्रस्त झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उंबरमाळी गावातील एक महिला गुरे चारण्यासाठी शेजारच्या भागात गेली असता झाडाझुडपांमध्ये पडलेली कार तिच्या लक्षात आली. कारजवळ गेल्यावर तिला तीव्र दुर्गंधी जाणवली. त्यामुळे महिलेला संशय आला आणि तिने तातडीने गावकऱ्यांना बोलावले व कसारा पोलिसांना याबाबत माहिती दिली. (Crime news in Marathi)
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. या सगळ्यांनी क्रेनच्या साहाय्याने ओढ्याजवळच्या झुडुपातून कार बाहेर काढली. यानंतर कारची पाहणी केली असता आतमध्ये तीन मृतदेह आढळून आले. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होते. प्राथमिक तपासात ही कार मुंबईतील अंधेरी–खार परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मृतांमध्ये यज्ञेश वाघेला (वय अंदाजे २५–३०) याच्यासह अन्य दोघांचा समावेश आहे. मृतदेह कारमधून बाहेर काढण्यात आले असून अपघात नेमका कसा झाला, कोणत्या परिस्थितीत गाडी नाल्यात जाऊन पडली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. ही घटना उशिरा उघडकीस आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, मृतांच्या नातेवाईकांना याबाबत कळविण्यात आले आहे. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येत असून अधिक तपास सुरू आहे. या मृतदेहांची अवस्था पाहून कारमधील सगळ्यांचा मृत्यू चार ते पाच दिवसांपूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे हा घातपाताचा प्रकार असावा का, यादृष्टीनेही पोलिसांकडून तपास केला जात आहे.
आणखी वाचा