Nashik Crime : आडगाव (Adgaon), निफाड (Niphad) आणि छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) या रस्त्यांसाठी केलेल्या बांधकामाच्या नुकसान भरपाईपोटी मिळणार्‍या मोबदला रकमेपैकी 12 कोटी 61 लाख 68 हजार रुपये बनावट दस्तऐवजाद्वारे लंपास करणार्‍या मुख्य आरोपीस नाशिक शहर गुंडाविरोधी पथकाने राजस्थानमध्ये अटक केली आहे. शकुर अहमद जमालुद्दीन सैय्यद असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव असून इमोर्टल इन्फास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीमध्ये बेकायदेशीरपणे वर्ग करुन पंकज ठाकूर यांच्या कंपनीची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात 21 जानेवारी 2025 मध्ये फसवणुकीसह इतर गुन्हे दाखल करण्यात आले होते. 

याबाबत अधिक माहिती अशी की, तामिळनाडूतील अबान गृप कंपनी अंतर्गत ‘एशियन टेक’ ही कंपनी सरकारी व खाजगी रस्ते बांधकाम करुन देते. तिचे उपकार्यालय शहरातील तिडके कॉलनीतील यश अपार्टमेंट येथे होते. याच कंपनीच्या संपर्कात असलेल्या शकूर याने सन 2014 ते 2022 या कालावधीत एशियन टेक व आयएस झा या कंपन्यांचा विश्वास संपादन करुन ‘आयएस इफ्रा अँड बिल्डकॉन’ ही कंपनी 50 टक्के भागीदारीत चालू केली. 

बनावट दस्तऐवजाद्वारे कोट्यवधींचा अपहार

तेव्हा या कंपनीस महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नाशिक-निफाड- छ. संभाजीनगर हा मार्ग बीओटी तत्त्वावर तयार करण्यासाठी अंदाजे सोळा कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले होते. हे रस्ते काम पूर्ण झाल्यावर कंपनीने 6 मार्च 2004 पासून ओढा येथे टोलनाका उभारुन वसुली केली. दरम्यान, या रस्त्याचे काम तसेच मेंटनन्स (देखभाल) चांगली झाली नाही असे कारण देत, पीडब्लूडीने हा टोलनाका ताब्यात घेतला. त्यामुळे ‘आयएस इफ्रा अँड बिल्डकॉन’ कंपनीचे नुकसान झाले. त्यामुळे कंपनीने पीडब्ल्यूडविरोधात नुकसान भरपाईसाठी कंपनी लवादात (एनसीएलएटी) दावा दाखल केला. त्याचा निकाल कंपनीच्या बाजूने लागून लवादाने पीडब्ल्यूडीला सोळा टक्के व्याजासह नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पीडब्लूडीने ही नुकसान भरपाई व्याजासह 25 कोटी रुपयांपर्यंत असताना 12 कोटी रुपये 61 लाख रुपये ‘आयएस इन्फ्रा अँड बिल्डकॉन’ ला दिली. 

सापळा रचून आरोपीला बेड्या

मात्र, आयएस इफ्रा अँड बिल्डकॉनच्या शकूर अहमद जमालुद्दीन सैय्यद (63, रा. डी एक्स ए-२, ब्लॉक नं.सी, एडब्ल्यूएचओ, पवननगर, सिडको, नाशिक, मुळ रा. सिकर (राजस्थान) व संदीप रविंद्र भाटीया, करण सिंग, जोजी थॉमस व इमोर्टल कंपनीचे काही संचालकांनी संगनमत करुन बँक्त बनावट कागदपत्रे सादर करून वरील रक्कम ‘इमोर्टल इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीच्या बँक खात्यामध्ये वर्ग केले. ही माहिती जोजी थॉमस याने अबान ग्रुपला कळविली नाही व फसवणूक केली होती. नाशिक गुंडा विरोधी पथकाने दोन दिवस सापळा रचून आरोपी शकुर अहमद जमालुद्दीन सैय्यद यास फत्तेपूर रोड, अली नगर, सिकर परिसरातून ताब्यात घेतले. त्यानंतर पथकाने पुढील कारवाईसाठी त्यास नाशिकमध्ये आणून नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आणखी वाचा

Nashik : सिगारेटच्या किमतीरुन टपरी चालक आणि ग्राहकामध्ये तुंबळ हाणामारी, अवघ्या एका रुपयासाठी जीव गेला