नाशिक : शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या (Nashik Crime News) घटनांमध्ये वाढ होत आहे. आता पंचवटी (Panchavati) परिसर खुनाच्या घटनेने हादरला आहे. काल रात्री सव्वा दहा ते साडे दहाच्या सुमारास किरकोळ कारणातून टोळक्याकडून युवकाची हत्या करण्यात आली आहे. विशांत भोये (29) असे मयत तरुणाचे नाव असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पंचवटी परिसरातील आडगाव पोलीस ठाण्यात (Adgaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक शहरातील पंचवटीमध्ये काल रात्री सव्वा दहा ते साडे दहाच्या सुमारास बिडी कामगारनगर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळ विशांत भोये आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता. यावेळी त्याठिकाणी अचानक काही महिला आल्या आणि त्यांनी विशांत व त्याच्यासोबत उभ्या असलेल्या मित्रांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली.
आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
त्यानंतर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने विशांतवर हल्ला केला. यातील एका संशयिताने विशांतला थेट कोयत्याने छातीवर वार केला. यावेळी विशांत जमिनीवर धारातीर्थ पडला. विशांतला त्याच्या मित्रांनी तत्काळ उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याच्या छातीवर वर्मी घाव लागल्याने डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. दोन दिवसांपूर्वी लहान मुलांच्या किरकोळ कारणावरून किरकोळ वाद झाला होता, त्यातून खून झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंचवटी पोलीस ठाणे (Panchavati Police Station) येथे कार्यरत असलेले प्रकाश नेमाने (Prakash Nemane) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. प्रकाश नेमाने कर्तव्यावरून घरी जात असताना त्यांनी गावगुंडांना हटकले. यामुळे गावगुंडांना राग अनावर झाला. रागाच्या भारत त्यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाने यांनी दगडाने जबर मारहाण केली होती. या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाने गंभीर जखमी झाले होते. ऐन निवडणुकीच्या काळात थेट पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला झाल्याने नाशिक शहरातील गुन्हेगारीची चर्चा आता राज्यभरात रंगली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पैसे पुरवल्याचा आरोप, नागपुरातून सुमित वाघला पोलिसांकडून अटक