Nashik Container Loot Case : 400 कोटी रुपयांच्या कंटेनर चोरी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट, चोरी झालीच नसल्याचं पोलीस तपासात उघड, नेमकं काय होतं प्रकरण?
Nashik Container Loot Case : संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील 400 कोटी रुपयांच्या कथित कंटेनर लुटी आणि अपहरण प्रकरणात आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे.

Nashik Container Loot Case : संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील 400 कोटी रुपयांच्या कथित कंटेनर लुटी आणि अपहरण प्रकरणात आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सातही संशयितांची इगतपुरी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याची माहिती समोर येत आहे. फिर्यादी संदीप पाटील यांची तक्रार बनावट असल्याचे न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट झाले आहे.
Nashik Container Loot Case : नेमकं काय होतं प्रकरण ?
फिर्यादी संदीप पाटील यांनी कर्नाटक राज्यातील चोरला घाट परिसरात 2 हजार रुपयांच्या जुन्या नोटांनी भरलेला, तब्बल 400 कोटी रुपयांचा कंटेनर चोरीला गेल्याचा दावा केला होता. या कथित लुटीच्या अनुषंगाने मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाने व त्याच्या साथीदारांनी आपले अपहरण केल्याचा आरोप करत त्यांनी नाशिक जिल्ह्यातील घोटी पोलीस ठाण्यात (Ghoti Police Station) गुन्हा दाखल केला होता. प्रचंड रकमेच्या उल्लेखामुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेत आले होते.
Nashik Container Loot Case : SIT तपासात उघड झाल्या मोठ्या विसंगती
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले. या पथकाने लोकेशन डेटा, कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR), प्रवासमार्ग, सीसीटीव्ही फुटेज आणि घटनाक्रमाचा सखोल अभ्यास केला. तपासादरम्यान फिर्यादीने सांगितलेल्या घटनाक्रमात आणि उपलब्ध तांत्रिक पुराव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती आढळून आल्या. अखेर अशी कोणतीही कंटेनर लूट घडलीच नसल्याचे तपासात स्पष्ट झाले.
Nashik Container Loot Case : सात जणांना अटक, पण ठोस पुरावा नाही
या प्रकरणात पोलिसांनी मुंबई, गुजरात आणि कल्याण येथून किशोर सावला यांच्यासह विराट गांधी, जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ, मच्छिंद्र मढवी आणि जनार्दन धायगुडे अशा सात जणांना अटक केली होती. मात्र, न्यायालयात सरकारी पक्षाला आरोपींविरोधात ठोस आणि विश्वासार्ह पुरावे सादर करता आले नाहीत. सर्व बाजू तपासल्यानंतर न्यायालयाने सातही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले.
Nashik Container Loot Case : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
न्यायालयीन निकालानंतर मुक्त झालेल्या आरोपींच्या नातेवाईकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. खोटी तक्रार दाखल होण्यामागे काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली असून, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच, खोटी तक्रार देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या संदीप पाटील यांच्यावर कठोर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, मूळ तक्रार बनावट ठरल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
आणखी वाचा
























