नांदेड : महाविद्यालयात शिकणाऱ्या तीन तरुणी आप आपल्या मित्रासह लॉजवर गेल्या होत्या. त्यातील एका तरुणीच्या भावाला याची कुणकुण लागताच भावाने बहिणीला लॉजवर रंगेहाथ पकडले. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात हा प्रकार घडल्यानंतर मोठा राडा झाला आहे. अर्धापूर तालुक्यातील एका गावात तीन तरुणी महाविद्यालयाच्या (College) तृतीय वर्षात शिकतात. 21 जुलै रोजी कॉलेज सुटल्यानंतर दुपारी ह्या तीन तरुणी आप-आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरुन तामसा रोड येथील हॉटेल गारवा लॉजवर गेल्या. त्यातील एका तरुणीच्या भावाला बहीण लॉजवर गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर, अल्पवयीन भाई आपल्या दोन मित्रांसोबत हॉटेल गारवा लॉजवर पोहचल्यानंतर मोठा राडा झाला. याप्रकरणी, जिवे मारण्याचा प्रयत्न अन् अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून (Police) अधिक तपास सुरू आहे.
भावाने बहिणीला आणि तरुणाला एका खोलीत रंगेहाथ पकडल्यानंतर दोघात वाद झाला. घाबरलेल्या तरुणीने पहिल्या माळ्यावरुन उडी मारून पळ काढला, यात तिचा एक हाथ मोडला. दरम्यान तरुणीचा अल्पवयीन भाऊ आणि अन्य दोघांनी तरुणाला लॉजमधून बाहेर आणले. त्यानंतर, भोकर फाट्याजवळ आणून त्याला मारहाण करुन पोटात खंजर भोसकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, जखमी तरुणीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेनं नांदेड जिल्हा हादरला असून कॉलेजमधील तरुणाईंमध्ये चाललंय काय, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.
मुलींकडून अत्याचार केल्याची फिर्याद
दरम्यान, 21 जुलै रोजी कॉलेज सुटल्यानंतर तीन तरुणांनी आम्हा तिघींना बळजबरी दुचाकीवर बसवून लॉजवर नेले आणि त्यात अत्याचार केल्याची तक्रार पीडित तरुणीने दिली आहे. त्यावरुन, पोलिसांनी तिघांवर अत्याचार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. तर मारहाण झालेल्या तरुणाच्या तक्रारीवरुन अल्पवयीन आरोपीसह तिघांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सखोल तपास सूरू असल्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले.
हेही वाचा