Nanded Crime: नांदेडमध्ये अंतरजातीय प्रेमसंबंधातून सक्षम ताटे (Saksham Tate) या 19 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. हा खून सक्षमची प्रेयसी आंचल मामीडवार (Anchal Mamidwar) हिच्या वडिलांनी आणि भावांनी केला आहे. या भयंकर घटनेनंतर आंचलने सक्षमच्या पार्थिवाशी विवाह केला. एवढ्यावर न थांबता तिने स्वतःच्या वडील आणि दोन भावांविरोधात पोलिसात धाडसाने साक्षही दिली आहे. सक्षमच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणीदेखील आंचलने केली आहे.
या प्रकरणानंतर आता सक्षमच्या आई संगिता ताटे (Sangita Tate) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “मी आंचलला मुलगी नव्हे, तर माझा मुलगाच मानणार आहे,” असे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले. “सक्षमचे सर्व हक्क मी तिला देईन. तिची साथ आयुष्यभर सोडणार नाही,” असेही संगिता ताटे यांनी स्पष्ट केले आहे. हत्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आंचल त्यांच्या घरात राहत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
Nanded Crime: मी देखील तिची साथ आयुष्यभर सोडणार नाही
एका वृत्तवाहिनीशी बोलताना संगिता ताटे म्हणाल्या, “सक्षमच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी आंचल मला पोलीस स्टेशनमध्ये भेटली. ती खूप रडत होती आणि माझ्याबरोबरच ती घरी आली. माझ्या गळ्यात पडून ती रडली आणि म्हणाली की मी तुमच्याच घरी राहीन. त्या दिवशी मी तिला माझ्या घरी घेऊन आले. जसं मी माझ्या मुलावर प्रेम केलं, तसंच प्रेम मी आंचलवरही करीन. तिला मुलगी न मानता, सक्षमप्रमाणेच माझा मुलगा मानेल. तिच्यात मला सक्षम दिसतो. मी तिच्यावर माझ्या स्वतःच्या लेकीसारखं प्रेम करेन. जोपर्यंत माझा जीव आहे, तोपर्यंत मी तिच्यावर प्रेम करत राहीन. तिने माझी साथ सोडली नाही, तर मी देखील तिची साथ आयुष्यभर सोडणार नाही. माझी एकच मागणी आहे की, माझ्या मुलाला न्याय मिळावा,” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
Nanded Crime: आंचलची प्रतिक्रिया
दरम्यान , या प्रकरणावर आंचलनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. सक्षम आणि आंचल यांचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र सक्षम वेगळ्या जातीचा असल्यामुळे हे संबंध आंचलच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. “सक्षम ताटे जेलमधून सुटून आल्यानंतर माझ्या घरच्यांनी त्याच्या हत्येचा कट रचायला सुरुवात केली होती,” असा गंभीर आरोप आंचलने केला. ती पुढे म्हणाली, “आमच्या प्रेमसंबंधांना विरोध असल्यामुळे माझ्या वडिलांनी आणि भावानेच सक्षमची हत्या केली. पण ते हरले, माझा प्रियकर मृत्यू येऊनही जिंकून गेला.” आपल्या वडील आणि भावांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी कडक मागणीही आंचलने केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आंचलचे वडील गजानन मामीलवाडसह पाच जणांना अटक केली आहे. जयश्री मदनसिंह ठाकूर, गजानन बालाजीराव मामीलवाड, साहील ठाकूर, सोमाश लखे आणि वेदांत, अशी आरोपींची नावे आहेत.
आणखी वाचा