नालासोपारा :  ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, नागरिकांची सुरक्षा करणे, त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण तयार करण्याची जबाबदारी आहे, अशा पोलीस अधिकाऱ्याने एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. नालासोपारा पूर्वेकडील आचोळे पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकावर एका वकिल महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.  जानेवारी 2020 पासून हा सहाय्यक पोलीस निरीक्षक विविध ठिकाणी नेवून, बलात्कार करत असल्याचे तक्रारीत पीडितेने म्हटले आहे.
 
मल्हार धनराज थोरात असं आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षकाच नाव आहे. तो पालघर पोलीस ठाण्यात सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी होता. त्याने नालासोपारा, वालीव आणि दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी काम केलं आहे.
 
पीडित महिला ही 33 वर्षाची असून, ती व्यवसायाने वकिल आहे. आरोपी थोरातने पीडितेला मारण्याची धमकी देत तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ नवऱ्याला पाठवेल, सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी देत असे. या धमकीचा गैरफायदा घेऊन आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरातने पीडित  महिलेवर वेळोवेळी बलात्कार केला असल्याचा आरोप आहे. त्याच बरोबर तक्रारदार पीडित महिलेचे व्हॉटसॲपवर त्याने नग्न व्हिडीओ आणि फोटो मागवत असे. आरोपीने पीडितेवर कारमध्ये, विविध लॉज, हॉटेलमध्ये बलात्कार केला असल्याचा आरोप आहे. आरोपी हा पीडितेबरोबर जबरदस्ती अनैसर्गिक दुष्कृत्य ही करत असल्याची तक्रार पीडितेने आचोळे पोलीस ठाण्यात दिली आहे. सध्या आरोपी मल्हार थोरात हा फरार आहे. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.


पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन पतीकडून पत्नीची गळा चिरुन हत्या


 चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीचा गळा चिरुन खून (Murder) केल्याची घटना पुण्यातील (Pune) येरवडा भागात घडली. लग्नाच्या अवघ्या दीड वर्षानंतर पतीने संशयातून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (9 सप्टेंबर) घडला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. तर विमानतळ पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.


रुपाली उर्फ बबिता भोसले (वय 35 वर्षे) असं खून झालेल्या महिलेचं नाव असून आशिष भोसले (वय 32 वर्षे) असं अटक केलेल्या आरोपी पतीचं नाव आहे. या प्रकरणी स्वप्नी बाळासाहेब खांडवे यांनी विमानतळ पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपी आशिष भोसलेला अटक केली आहे. रुपाली आणि आशिष यांचं लग्न दीड वर्षांपूर्वी झालं होतं. लोहगावमधील संतनगरमध्ये ते भाड्याने घेतलेल्या घरात राहत होते. आशिष हॉटेलमध्ये साफसफाईचे काम करतो तर रुपाली धुणे-भांडी करुन घर चालवत होती. त्यांना सात महिन्यांची मुलगी देखील आहे. मात्र मागील काही दिवसांपासून रुपालीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आशिष आला होता. त्यातून त्याने अनेक वेळा तिच्याशी भांडणही केलं होतं.