Nalasopara Crime News: नालासोपारा - बी.एम.डब्लू, जॅग्वार आणि इतर नामांकित कंपनीच्या सायकली चोरी करणारा सराईत चोर आचोळे पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याच्याकडून नामांकित कंपनीच्या 11 सायकली आचोळे पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर पाटील यांचा मुलगा नालासोपारा पूर्वेकडील एव्हरशाईन रोड येथे सायकल उभा करुन पात्र विधीसाठी गेला असता, अज्ञात चोरट्याने भर रस्त्यावरुन सायकल चोरुन नेली होती. याबाबत शंकर पाटील यांनी 17 डिसेंबरला आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. शहरात वाढती सायकली चोरीमुळे नागरीक त्रस्त झाले होते. सायकल चोरीचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेकडे देण्यात आला. गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने चोरट्याचा शोध घेत होते. तेवढ्यात 18 डिसेंबरला साढे पाच वाजता, नालासोपारा पूर्वेकडे आचोळे जाणाऱ्या रोडवर वसंत नगरी गेटचे दिशेने एक इसम विवेलो कंपनीची नारंगी काळया रंगाची गिअर असलेली सायकल चालवत घेवून जात असताना, आचोळे पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि अंमलदार हे गस्तीवर असताना दिसून आला. पोलिसांनी सायकल थांबवून विचारपूस केली असता, त्यांने उडवा उडवीची उत्तरे दिली.
पुढे पोलिसांनी सायकलबाबत चौकशी करण्यासाठी त्याला आचोळे पोलीस ठाण्यात नेलं आणि आचोळे पोलिस ठाण्यात शंकर पाटील यांनी दिलेली सायकल चोरीच्या तक्रारीत या कलरची आणि कंपनीची सायकल चोरी गेल्याच स्पष्ट झालं. आचोळे पोलिसांनी राजकुमार मेवाडा या 18 वर्षाच्या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून 11 सायकली पोलिसांना सापडल्या आहेत. यात प्रामुख्याने बीएमडब्लू, जॅग्वार या नामांकित कंपनीच्या सायकली होत्या. या 11 सायकलीची किंमत 98 हजार एवढी आहे. आचोळे पोलिसांनी सर्व सायकली ताब्यात घेतल्या आहेत. पोलिसांनी ओरोपीवर गुन्हा दाखल करुन, तपास सुरु केला आहे. आरोपीने आतापर्यंत नालासोपारा पोलीसा ठाणे आणि माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीत सायकली चोरी केल्या आहेत. या सर्व सायकली तो विकण्याच्या तयारीत होता. मात्र त्याच्या या सायकली कुणी घेण्यास तयार होतं नव्हतं. आता इतर अन्य पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपीने सायकल चोरी केल्यात का? किंवा या सायकल चोरीत त्याचे अन्य कुणी साथीदार आहेत का? याबाबत आचोळे पोलीस चौकशी करत असल्याची माहिती आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी दिली आहे.