Nalasopara Crime : नालासोपाऱ्यात पाच वर्षांच्या चिमुकलीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही हत्या तिच्याच 13 वर्षीय आत्येभावाने केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. लहान बहिणीवर घरातील सर्वजण अधिक प्रेम करतात, हे सहन न झाल्याने त्याने संतापाच्या भरात तिचा गळा दाबून आणि डोक्यात दगड घालून हत्या केल्याचे उघड झाले आहे.
अधिकची माहिती अशी की, फिर्यादी मोहम्मद सलमान मोहम्मद रमजान खान (वय 33) हे नालासोपारा पूर्वेच्या श्रीराम नगर येथे राहतात. त्यांना दोन मुली असून, त्यांची धाकटी मुलगी शिद्राखातून ही पाच वर्षांची होती. शनिवारी दुपारी त्यांनी तिला शाळेतून घरी आणले होते. संध्याकाळी ती घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली, मात्र ती कुठेच आढळली नाही. अखेर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एका कॅमेऱ्यात फिर्यादी खान यांचा 13 वर्षीय भाचा शिद्राखातून हिला घेऊन जाताना दिसला. त्याला विचारले असता, दोन अज्ञात व्यक्तींनी शिद्राखातूनची हत्या केल्याची खोटी माहिती त्याने दिली. घाबरलेले कुटुंबीय रात्री साडेअकरा वाजता पेल्हार पोलीस ठाण्यात पोहोचले.
पोलिसांनी रात्रीच्या वेळी डोंगर परिसरात शोध घेतला असता, तिथे शिद्राखातूनचा मृतदेह आढळला. तपासादरम्यान पोलिसांनी संशयित 13 वर्षीय मुलाची कसून चौकशी केली असता, त्याच्या जबाबात अनेक विसंगती आढळल्या. अधिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांच्या तपासात समोर आले की, संपूर्ण कुटुंब शिद्राखातूनवर विशेष प्रेम करत होते. तिच्यावर होणारा लाड बघवत नसल्याने आरोपी भावाने तीचा डोंगरात नेऊन गळा दाबला आणि त्यानंतर डोक्यात दगड घालून तिचा जीव घेतला. पोलिसांनी विधी संघर्ष बालकाला (ज्युवेनाईल आरोपी) ताब्यात घेतले असून, सोमवारी त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाणार आहे. पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी ही माहिती दिली. ही हृदयद्रावक घटना नालासोपाऱ्यात खळबळ उडवणारी ठरली असून, कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या