नागपूर : सध्याची तरुणाई डिजिटल झाली असून झेन जी पिढी सतत ऑनलाईन कार्यरत असते. त्यामुळे, ऑनलाईन मैत्री, सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर आणि डिजिटल पद्धतीनेच त्यांचा वावर असतो. अलिकडे डेटींग अॅपच्या (Dating) माध्यमातून तरुण-तरुणी मैत्री करतात, नंतर भेटतात आणि एकमेकांमध्ये खटकेही उडतात. नागपूर शहरातील "सदर" पोलीस स्टेशन हद्दीत अशाच डेटिंग ॲपच्या माध्यमातून ओळख झालेल्या तरुणीने तरुणाची हॉटेलमध्ये नेऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. हॉटेलमध्ये (Hotel) तरुणीसोबत जेवण केल्यानंतर चक्क 35,000 रुपयांचे बिल आल्याने तरुणाचा गोंधळ उडाला होता. याप्रकरणी, तरुणाने थेट पोलीस (Police) ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाची डेटिंग ॲपवर एका तरुणीसोबत ओळख झाली होती. मोबाईल नंबरची देवाण घेवाण झाल्यानंतर दोघांमध्ये काही दिवस चॅटिंग आणि बोलणे झाले. त्यानंतर तरुणीने त्याला भेटण्यासाठी नागपूरच्या सदर परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलावले. भेटीदरम्यान तरुणीने महागडे खाद्यपदार्थ आणि पेयपदार्थ (मद्य आणि बियर ) ऑर्डर केली. त्यामुळे, हॉटेलचे बिल खूप जास्त होत आहे अशी शंका तरुणाला आल्यामुळे त्याने वेटरला बोलावून बिल मागितले. तेव्हा हॉटेलकडून तब्बल 35 हजार रुपयांचे बिल तरुणाला देण्यात आले. बिल पाहून तरुणाला धक्का बसला. त्यामुळे, तरुणाने मेनू कार्डची मागणी केली असता त्याला हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला दाखवण्यात आलेला मेनू कार्ड आणि प्रत्यक्ष बिल आकारताना वापरण्यात आलेलं मेनू कार्ड वेगवेगळं असल्याचं लक्षात आलं. तसेच, बिलाची एवढी रक्कम आपण देऊ शकत नाही अशी भूमिका त्याने घेतल्यानंतर हॉटेलची मॅनेजर तसेच बाउन्सरने त्याला धमकावले. तरुण आणि हॉटेल मॅनेजर यांच्यातील गोंधळात तरुणासोबत आलेली ती तरुणी हॉटेलमधून गायब झाली.
पोलिसांकडून तरुणीचा शोध सुरू
दरम्यान, सर्वांनी मिळून आपली फसवणूक केल्याची जाणीव होताच तरुणाने सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित हॉटेल मालक आणि मॅनेजरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. त्यात त्या तरुणीची काय भूमिका आहे का? याचाही तपास पोलीस करत असून तिचा शोध घेतला जात आहे.
नागपुरात 4 कोटींचे ड्रग्ज जप्त
Directorate of Revenue Intelligence (DRI) च्या नागपूर प्रादेशिक युनिटने (NaRU), मुंबई झोन अंतर्गत, आंतरराज्यीय ड्रग तस्करी साखळीचा पर्दाफाश करत 853 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. या कोकेनची अंदाजे बाजार किंमत 4.26 कोटी रुपये इतकी आहे. गुप्त माहितीनुसार DRI अधिकाऱ्यांनी 12 एप्रिल रोजी ट्रेन क्रमांक 22692 हजरत निजामुद्दीन – KSR बेंगळुरू राजधानी एक्सप्रेस मध्ये प्रवास करणाऱ्या एका भारतीय महिलेला संशयावरून ताब्यात घेतले. ही ट्रेन नागपूर रेल्वे स्थानकातून जात असताना अधिकारी ट्रेनमध्ये चढले आणि संबंधित प्रवाशाला चौकशीसाठी खाली उतरवले. त्यानंतर ती महिला अजनी रेल्वे स्थानक येथे उतरली.
हेही वाचा
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
