Nagpur News :  स्कूल व्हॅन चालकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कोराडी पोलिस (Koradi Police) ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पवन काहपरे (वय 26, रा. नांदा) या आरोपी व्हॅन चालकाला अटक केली आहे. त्याच्याविरोधात पोक्सो (POSCO) आणि अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवन हा खापरखेडा येथील नांदा येथील रहिवासी आहे. आरोपी हा स्कूल व्हॅन चालक आहे. पीडित 15 वर्षीय विद्यार्थीनी ही शाळेत जाण्यासाठी आरोपीच्या व्हॅनमधून जात असे. या अल्पवयीन मुलीवर 12 ऑक्टोबर रोजी पवनने अत्याचार केला. आरोपीने पीडित विद्यार्थीनीला शाळेत नेण्यासाठी स्कूल व्हॅनमध्ये बसवले. मात्र, शाळेत नेण्याऐवजी कोराडी येथे फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने तिला निर्जन स्थळी नेले. त्या दरम्यान त्याने विद्यार्थीनीवर जोरजबरदस्ती करत शारीरिक अत्याचार केले. त्याच वेळी पवनने अत्याचार करतानाचा व्हिडिओ तयार केला होता. आरोपीची पीडितेच्या नातेवाईकांसोबत ओळख होती. त्यामुळे विद्यार्थीनी आणखी घाबरली. 


व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न!


या व्हिडीओच्या आधारे पवनने विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. पुन्हा शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आरोपीकडून पीडितेवर दबाव टाकण्यास येऊ लागला. पवनकडे व्हिडिओ असल्याने तिला ठोस विरोध करता येत नव्हता. अत्याचारामुळे विद्यार्थीनी भेदरली होती. तिच्या वागणुकीतील बदल कुटुंबीयांच्या लक्षात आला. कुटुंबीयांनी तिची विचारपूसही केली. तिचा मोबाइलही तपासल्यानंतर त्यांना आक्षेपार्ह एसएमएस मिळाले. त्यानंतर कुटुंबीयांनी परत तिला विश्वासात घेऊन विचारणा केली. तेव्हा विद्यार्थिनीने घडलेला प्रकार सांगितला. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी तात्काळ आरोपी पवनवर पोक्सो आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल करुन अटक केली. चौकशीदरम्यान पवन विवाहित असल्याची बाब देखील समोर आली आहे.


अनेक मुलींचे शोषण?


पवन हा स्कूलबस व्हॅन चालवतो. त्यामुळे त्याने आणि काही मुलींचे शोषण केले आहे का? त्याच्या बसमध्ये जाणाऱ्या मुलींसोबत महिला पोलिस विश्वासात घेऊन विचारपूस करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे विद्यार्थिनीला मोठा मानसिक धक्का बसला आहे. या पूर्वीही शहरातील काही भागात स्कूल व्हॅन चालकांकडून विद्यार्थीनीवर अत्याचाराच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे शाळा प्रशासन आणि पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पालकांनी आपल्या पाल्यांसोबत नियमित चर्चा करत राहावी आणि व्यवहारात बदल जाणवल्यास विचारपूस करावी असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.


हेही वाचा


EWS Reservation: सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल, EWS आरक्षण वैधच, घटनापीठाचा 3 विरुद्ध 2 असा निर्णय