Nagpur Crime News: 'नीट' फेरपरीक्षा तणावातून विद्यार्थिनीनं आयुष्य संपवलं, त्या चिठ्ठीवरुन नागपूर पोलिसांचा सावळागोंधळ उघड, तपास अधिकाऱ्यावर कारवाईची टांगती तलवार; नेमकं काय घडलं?
Nagpur Crime News: देशभरात गाजलेल्या 'नीट' पेपरफुटी आणि फेरपरीक्षेच्या तणावातून नागपुरात 19 वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले होते.

Nagpur Crime News: देशभरात गाजलेल्या 'नीट' (NEET) पेपरफुटी आणि फेरपरीक्षेच्या (Re-examination) तणावातून नागपुरात आकांक्षा चतुर्वेदी (Akanksha Chaturvedi) या 19 वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले होते. या प्रकरणात आता एक धक्कादायक वळण आले आहे. आकांक्षाने लिहिलेल्या सुसाईड नोटवरून नागपूर पोलिसांचा सावळागोंधळ समोर आला असून या प्रकरणातील गूढ अधिकच वाढले आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हयगय केल्याचा ठपका ठेवत तपास अधिकारी निखिल तव्हाणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
Nagpur Crime News: नेमकं काय घडलं?
आकांक्षाने 20 मे रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (X) वर पोस्ट करून एनडीए (NTA) आणि सरकारवर टीका केली होती. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी नागपूरच्या अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये (Ambazari Police Station) चौकशी केली असता, पोलिसांनी "अशी कोणतीही सुसाईड नोट आमच्याकडे नाही, ती असल्यास चतुर्वेदी कुटुंबाने पोलिसांकडे सुपूर्द करावी," अशी तोंडी माहिती दिली होती. चार जूनपर्यंत पोलिसांनी हाच दावा केला होता.
मात्र, आता समोर आलेल्या माहितीनुसार, ही सुसाईड नोट पहिल्याच दिवसापासून तपास अधिकारी निखिल तव्हाणे यांच्याकडे होती. त्यांनी स्टेशन डायरीमध्ये आणि आत्महत्येशी संबंधित कागदपत्रांमध्ये या सुसाईड नोटची नोंदच केली नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी हयगय केल्याचा आरोप करत निखिल तव्हाणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे.
Nagpur Crime News: नातेवाईकांचा व्हिडिओ व्हायरल
दरम्यान, आकांक्षाच्या नातेवाईकांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यामध्ये आकांक्षाने 20 मे रोजी टोकाचे पाऊल उचलल्यानंतर त्याच दिवशी तिची सुसाईड नोट खोलीतील एका टेबलावर सापडल्याचा आणि त्याच दिवशी आकांक्षाच्या कुटुंबीयांनी ती सुसाईड नोट पाहिल्याच दावा केला आहे. मात्र, आपल्या लेकीच्या आत्महत्येमुळे गोंधळून गेलेल्या कुटुंबीयांनी ती सुसाईड नोट त्याच दिवशी पोलिसांच्या स्वाधीन केली नव्हती, असा खुलासा ही आकांक्षाचे चुलत बंधू या व्हायरल व्हिडिओमध्ये करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे 20 मे रोजी ही घटना घडलेली असताना अनेक दिवस आकांक्षाची सुसाईड नोट समोर का येऊ शकली नाही? ती नागपूर पोलिसांनी लपवून ठेवली की आकांक्षाच्या कुटुंबीयांनीच ती पोलिसांना उशिरा स्वाधीन केली? या बद्दलचे गूढ अधिकच वाढले आहे. आता या प्रकरणात आणखी काय माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा






















