Uttar Pradesh Crime News : नुकताच प्रदर्शित झालेला 'लापता लेडीज' (Laapataa Ladies) बॉलिवूडपट (Bollywood) भलताच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या कथानकातील पात्रांकडून अनेकदा लुटेरी दुल्हन, लुटेरी दुल्हन गँग (Looteri Dulhan Gang) असे शब्द ऐकायला मिळतात. पोलीस कथानकात त्यांच्या शोधात असल्याचं पाहायला मिळतं. पण केवळ चित्रपटाच्या कथानकातच नाहीतर रिअप लाईफमध्ये लुटेरी दुल्हन गँगनं पोलिसांच्या तोंडचं पाणी पळवलेलं. पण अशातच या गँगच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांच्या हाताला यश आलं आहे.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुझफ्फरनगर (Muzaffarnagar) पोलिसांनी लुटेरी दुल्हन गँगचा (Looteri Dulhan Gang Arrested) पर्दाफाश करत सात जणांना अटक केली आहे. एवढंच नाहीतर पोलिसांनी आरोपींकडून मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केली आहे. सध्या पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरू असून अशा इतरही काही गँग अस्तित्वात आहेत का? याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.
मुझफ्फरनगर जिल्ह्यातील टिटवी पोलीस ठाण्यातील खेडी दुधाधरी गावातील रहिवासी बादल यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आपली सूत्र वेगानं हलवण्यास सुरुवात केली. कसून तपास करत पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला. उत्तराखंडमधील उधम सिंह येथे राहणाऱ्या बादल निक्कीसोबत त्याचा विवाह 1 मार्च रोजी झाला होता. मात्र, लग्नाच्या रात्रीच लुटेरी दुल्हन गँगमध्ये सामील असलेली दरोडेखोर नवरी घरातील दागदागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाली. याप्रकरणी नवरदेवाच्या कुटुंबियांनी तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंबीयांनी टिटवी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 380, 406 आणि 420 अन्वये गुन्हा दाखल केला. या टोळीतील सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये दरोडेखोर नवरी निक्की आणि तिची टोळी आशा, ओमवती, कृष्णा, नन्हे, इर्शाद आणि कविता यांचा समावेश आहे. पोलीस चौकशीत आरोपींनी सांगितलं की, त्यांनी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अनेकांना आपला शिकार बनवलं आहे. आतापर्यंत हे लोक पोलिसांच्या हाती लागले नव्हते. अखेर पोलिसांना त्यांच्या मुसक्या आवळण्यात यश आलं आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लुटेरी दुल्हन गँगचे लोक गरजू लोकांना आपल्या जाळ्यात अडकवायचे. निक्कीशी त्याचे लग्न लावायचे. ती लग्नाच्या रात्रीच घरातील सर्व सामान गोळा करून पळून जायची. टोळीतील इतर सदस्यांनी त्याला लग्नातून पळून जाण्यासाठी मदत केली. या घटनेबाबत एसपी ग्रामीण आदित्य बन्सल म्हणाले की, टिटवी पोलीस स्टेशननं लुटारू दुल्हन गँगचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी विशिष्ट पद्धतीनं काम करायची. आधी गोड बोलून ते लोकांना आपल्या जाळ्यात ओढायचे आणि त्यानंतर त्यांना लुटायचे.
एसपी ग्रामीण आदित्य बन्सल यांनी पुढे सांगितलं की, टोळीतील काही सदस्य निकीची आई, काही वडील, काही भावासोबत नातेवाईक बनले होते. यानंतर प्रथा आणि परंपरेनुसार मोठ्या थाटामाटात लग्न पार पडले. मुलीची यथोचित पाठवणी करण्यात आली. सासरच्या घरी गेल्यावर लग्नाच्या रात्रीच दरोडेखोर नवरी घराची साफसफाई करून आपल्या टोळीच्या मदतीनं पळून जायची. अशाच प्रकारची तक्रार टिटवी पोलीस ठाण्यात 1 मार्च रोजी प्राप्त झाली होती. यानंतर पोलिसांनी तपास करून टोळीच्या सदस्यांना अटक केली.