RPF Custody Imran Sheikh Dies Mumbai Crime : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील रेल्वे पोलिसांच्या कोठडीत 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील खंडवा येथील इमरान शेख याचा मृत्यू झाला आहे. रोजगाराच्या शोधात तो दोन दिवसांपूर्वी मुंबईत आला होता. दरम्यान, आता या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी महाराष्ट्र CIDकडे सोपवण्यात आली आहे.

Continues below advertisement

रेल्वे पोलिसांच्या चौकीत नेमकं काय घडलं?

मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, 20 सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे 10 वाजून 18 मिनिटांनी तो सीएसएमटी मुख्य आरपीएफ पोस्टवर खंडव्याला जाणाऱ्या गाड्यांची माहिती विचारण्यासाठी आला. त्यावेळी तो अस्वस्थ अवस्थेत होता. काहीजण आपल्याला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा तो करत असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.  यानंतर तो आक्रमक झाला. RPFच्या म्हणण्यानुसार, त्याने RPFचे SI अनिकेत यांच्यावर हल्ला केला तसेच स्वत:लाही मारून घेतले. स्वत:ला किंवा इतरांना इजा होऊ नये म्हणून त्याला आवरण्यात आले. 

Continues below advertisement

शौचालयात गेला अन् काही मिनिटांतच...

सुमारे 12.30 वाजण्याच्या सुमारास इमरानला शौचालय वापरण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, सात ते आठ मिनिटे कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शौचालयाचा दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी इमरान आतमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्यानंतर त्याला तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, सुमारे 12.54 वाजता रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर सीएसएमटी जीआरपीकडून अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात इमरानच्या नातेवाईकांकडून जीआरपीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. इमरानला मारहाण झाल्याचा आरोपही नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.

इमरानकडे सापडली रेल्वेची तिकिटे

दुसरीकडे, मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, इमरानने आधी जीआरपी कर्मचाऱ्यांवर हात उचलला होता. इमरानकडे कोणतेही ओळखपत्र किंवा मोबाईल फोन आढळला नसल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे. मात्र, त्याच्याकडे रेल्वेची दोन जनरल तिकिटे सापडली. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, त्यापैकी एक तिकीट खंडवा-भुसावळ, 18 सप्टेंबर 2026 रोजीचे, तर दुसरे नाशिक-दादर, 19 सप्टेंबर 2026 रोजीचे आहे. त्याचा फोटो ओळख पटवण्यासाठी भुसावळ विभाग तसेच स्थानिक पोलिसांकडे पाठवण्यात आला आहे. त्याच्या मुंबईतील हालचाली आणि तो नेमका कोणत्या कारणासाठी मुंबईत आला होता, याचाही तपास केला जात आहे.

CIDकडे तपास, पोस्टमार्टमची प्रतीक्षा

RPFच्या ताब्यात असताना मृत्यू झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांच्या CIDकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे. CID कोकण रेंजचे SP प्रशांत वाघुंडे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असल्याची माहिती आहे. इमरानच्या मृतदेहाचे जेजे रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आले असून, त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. पोस्टमार्टम अहवाल आणि CCTV फुटेज या दोन्हींच्या आधारे मृत्यूचे नेमके कारण आणि परिस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.