Mumbai Crime : मुंबईत (Mumbai) इम्पीरियल ट्विन टॉवर कॉम्प्लेक्समध्ये स्टंट (Stunt) करण्यासाठी जाणाऱ्या दोन रशियन यूट्यूबर्सना (YouTubers) ताडदेव पोलिसांनी (Tardeo Police) पकडलं. हे दोन्ही रशियन युट्यूबर जीवघेणे स्टंट करण्यासाठी इमारतीत गेले होते. ही बाब इमारतीमधील सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास येताच त्यांनी ताडदेव पोलिसांना याची माहिती देऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न सुरु केला. अखेर अडीच तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर या दोन्ही रशियन यूट्यूबर्सना ताडदेव पोलिसांनी पकडलं आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. ते सध्या पोलीस स्टेशनमध्येच असून त्यांना अटक केलेली नाही.

Continues below advertisement

सोमवारी (26 डिसेंबर) रात्री हा प्रकार घडला. हे दोन्ही रशियन यूट्यूबर्स स्टंट करण्यासाठी इम्पीरियल ट्विन टॉवर कॉम्पेक्ल्समध्ये गेले होते. दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू परिसरांपैकी एक असलेल्या ताडदेवमध्ये 60 मजल्यांचे ट्विन टॉवर आहेत. ही रहिवासी इमारत आहे. यामध्ये शहरातील अनेक कुटुंब राहतात. सीसीटीव्ही कंट्रोल रुममधील सुरक्षारक्षकाने या दोन्ही यूट्यूबर्सना वरच्या मजल्यावर चढून जाताना पाहिलं. त्यानंतर सुरक्षारक्षकाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन तासांहून अधिक चाललेल्या नाट्यानंतर त्यांना पकडण्यात अखेर यश आला. त्यानंतर त्यांना ताडदेव पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं.

ट्विन टॉवरवर स्टंट करण्याचं स्वप्न अधुरं

अडीच तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर त्यांना पकडण्यात आलं. चौकशीदरम्यान दोघांनी पोलिसांना सांगितलं की, ते पायऱ्यांवरुन एका टॉवरच्या 58व्या मजल्यापर्यंत गेले होते. स्टंट करत ते इमारतीवरुन खाली येणार होते. त्यांना आपल्या या स्टंटचा व्हिडीओ रेकॉर्ड करायचा होता. परंतु आधीच त्यांना पकडल्याने ट्विट टॉवरवरुन स्टंट करण्याची इच्छा अपूर्ण राहिली.

Continues below advertisement

पोलिसांनी रशियन दूतावासाला कळवलं 

मक्सिम शचरबाकोव (वय 25 वर्षे) आणि रोमन प्रोशिन (वय 33 वर्षे) अशी अटक केलेल्या दोन्ही रशियन यूट्यूबर्सची नावं आहे. दोघांना पकडल्यानंतर खाजगी मालमत्तेत घुसखोरी करणे, जीव धोक्यात घालून स्टंट व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करणे या कलमांखाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ताडदेव पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराची माहिती रशियन दूतावासाला देखील दिली आहे.

याआधी स्टंट करताना परदेशी नागरिक अटकेत

दरम्यान परदेशी नागरिक स्टंट करताना पकडले जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2021 मध्ये वांद्रे-वरळी सी लिंकवर आणखी दोन रशियन नागरिकांना अटक करण्यात आली होती. तर नोव्हेंबर 2018 मध्ये प्रभादेवीमध्ये सहा परदेशी लोकांना पार्कोर हा स्टंट करताना पकडण्यात आले होते.