Mumbai News : मुंबईतील (Mumbai) घाटकोपर (Ghatkopar) पूर्वेमधील चाळिशीतील दाम्पत्य (Couple) काल (8 मार्च) राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. दीपक शाह आणि रीना शाह अशी मृतांची नावं आहेत. घाटकोपर पूर्वेतील पंतनगरच्या कुकरेजा पॅलस या टॉवरमधील घरातील बाथरुममध्ये या दाम्पत्याचा मृतदेह आढळला. त्यांच्या मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या खुणा आढळलेल्या नाहीत. शवविच्छेदनासाठी मृतदेह राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital) पाठवण्यात आला होता. अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान पंतनगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करुन पुढील तपासाला सुरुवात केली आहेत.


धुळवड खेळून घरी आले आणि...


दीपक शाह (वय 42 वर्षे) आणि रीना शाह (वय 39 वर्षे) हे दाम्पत्य कुकरेजा पॅलेज या टॉवरमध्ये G-501 इथे राहत होते. हे दाम्पत्य मंगळवारी (7 मार्च)  शेजारी आणि कुटुंबियांसोबत धुळवड खेळून घरी आलं. काल (8 मार्च) सकाळी जेव्हा त्यांच्या घरी काम करणारी बाई आली. तिने दरवाजा ठोठावला असता कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने या महिलेने शाहांच्या नातेवाईकांना याबाबत कळवलं. नातेवाईकांनी याची माहिती पंतनगर पोलिसांना दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता हे दाम्पत्य बाथरुममध्ये मृतावस्थेत आढळलं.


मृतदेहावर कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत!


पोलिसांनी पंचनामा करुन दोघांचे मृतदेह राजावाडी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. या दाम्पत्याच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू कसा झाला हे स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान या पती पत्नीच्या मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या खुणा आढळल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा मृत्यू कसा झाला असावा याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान बाथरुममधील गिझरमुळे दाम्पत्याचा मृत्यू झाला असावा अशी शंका इमारतीलमधील काही रहिवाशांनी व्यक्त केली.


पोलिसांनी काय माहिती दिली?


दीपक शाह यांचा कपड्यांचा व्यवसाय होता. या दाम्पत्याला अपत्य नव्हतं आणि इथे ते दोघेच राहत होते. आंघोळ करताना त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. दोघांच्याही शरीरावर खुणा आढळलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याची स्पष्टता नाही. आम्ही शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत आहोत, असं पंतनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविदत्त सावंत यांनी सांगितलं.


VIDEO : Ghatkopar Couple Death : घाटकोपरमध्ये दाम्पत्य मृतावस्थेत सापडले, पोलिसांचा तपास सुरु : ABP Majha