मुंबई : मानखुर्दच्या साठे नगर परिसरामध्ये 65 महिलांचे कागदपत्रं घेऊन त्यांच्या नावावर कझ्युमर लोन काढून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिलांच्या नावाने सुमारे 20 लाखांचे कर्ज काढून त्या पैशातून अनेक आयफोन्स खरेदी केल्याचं समोर आलं. या प्रकरणी मानखुर्द पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी सुमित गायकवाड आणि राजू बोराडे या दोघांना ताब्यात घेतलं असून इतर तिघांचा शोध सुरू आहे.
मानखुर्दमधील या महिलांकडून आधारकार्ड आणि इतर महत्त्वाची कागदपत्रं घेण्यात आली आणि त्याच्या बदल्यात चार ते पाच हजार रुपये देण्यात आले होते. त्यानंतर जमा करण्यात आलेली सर्व कागदपत्रे ही बजाज फायनान्स कंपनीमधील कर्मचाऱ्यांना देऊन त्यावर कंझ्युमर लोन काढण्यात आले. या लोनच्या माध्यमातून विविध ठिकाणी आयफोन्स खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
महिलांना चार ते पाच हजार रुपये द्यायचे
सदर प्रकरणाची माहिती मानखुर्द पोलिसांना मिळताच पोलिसांनी सुमित गायकवाड आणि राजू बोराडे या दोघांना ताब्यात घेतलं आहे. हे दोघे या महिलांकडून कागदपत्रं खरेदी करून त्या बदल्यात त्यांना चार ते पाच हजार रुपये देत असत. आतापर्यंत त्यांनी 20 लाख 7 हजार रुपयांचे कर्ज या महिलांच्या नावावर काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय
या सोबतच आणखीन तिघांचा शोध सध्या मानखुर्द पोलिस घेत आहेत. यामध्ये बजाज फायनान्स मधील काही कर्मचाऱ्यांचा देखील हात असल्याचं पोलिसांचा संशय आहे. त्यानुसार पोलिस चौकशी करत आहेत.
बँक पासबूक, आधारकार्ड, पॅन कार्ड यासह अनेक कागदपत्रं घेतली. कर्ज क्लिअर करतो आणि सीबील स्कोअरही चांगला करून देतो असं महिलांना आमिष देण्यात आलं होतं. नंतर फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर फोन उचलण्यास टाळाटाळ केली.
अनेक महिलांची अशी फसवणूक केल्यामुळे त्यांच्या बँक अकाऊंटवरून महिन्याला पैसे कट होतात. त्यामुळे इतर ठिकाणी कर्जही काढता येत नसल्याचं महिलांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
दरम्यान, या संदर्भात लाडक्या बहिणीसारखी एखादी योजना आली असल्याचे सांगून या भामट्यांनी कागदपत्रे घेतली असे म्हटले जात आहे. परंतु पोलिसांनी असे काही अँगल असल्याचे नाकारले आहे. तर या महिलांनी त्यांची झालेली ही फसवणूक लाडकी बहीण योजना येण्याच्या आधीची असल्याचे स्पष्ट केलं. यामध्ये लाडकी बहीण योजनेशी सबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.