Mumbai Vasai Virar Crime : भर रस्त्यात एका प्रियकराने आपल्या प्रेयसीवर लोखंडी पान्याने वार करून हत्या केली. वसई पूर्वेच्या (Vasai News) गावराई पाडा येथे मंगळवारी सकाळी ही घटना घडली. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरच बसून होता. त्याला वालीव पोलिसांनी (Police) अटक केली आहे. आरोपीचं नाव रोहित यादव असल्याचं समोर आलेय. या प्रकरणामुळे मुंबईसह (Mumbai News) उपनगरात एकच खळबळ उडाली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी याप्रकरणाची दखल घेत सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तर विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 


गावराई पाडा येथे सकाळी रोहितने आपल्या एक्स गर्ल्डफ्रेंडवर लोखंडी पान्याने वार केले. एकदा नाही तर तब्बल 15 वेळा त्यानं तिच्यावर हल्ला केला. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती, त्यामधील एकही व्यक्ती मदतीसाठी पुढे आला नाही, फक्त पाहात राहिले किंवा व्हिडीओ काढत राहिलेय. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रत्येकाला राग अनावर झाला. तरुणीवर हल्ला करणाऱ्याला माणूस म्हणावं की हैवान? असा प्रश्न उपस्थित झालाय. 


सपासप वार केल्यानंतर मृतदेहाला जाब विचारत होता - 


रोहितच्या मानगुटीवर संशयाचं भूत, मस्तकात राग आणि हातात लोखंडी पाना...जिच्यावर रोहित यादवनं प्रेम केलं, त्याच आरती यादवची दिवसाढवळ्या भररस्त्यात निर्घृणपणे हत्या केली. वसई पूर्वच्या चिंचपाडा परिसरातली सकाळी साडेआठ वाजता रोहितने डाव साधत आरतीवर हल्ला केला. आरती कामाला निघाली होती. पाठलाग करणाऱ्या रोहितनं आधी आरतीला जमिनीवर पाडलं.. मग तिच्यावर लोखंडी पान्याने एकामागे एक 15 वेळा हल्ला केला. हे सगळं घडत असताना बरीच गर्दी जमा झाली. एक जण रोहितला रोखण्यासाठी पुढे आला. पण रोहितने त्याच्यावर देखील पाना उगारल्याने तो मागे सरला. आरती निपचीत पडली. तीने प्राण सोडले होते. मात्र रोहितमधला हैवान शांत झाला नाही. क्यूं किया क्यूं किया... असे म्हणत तो आरतीच्या मृतदेहाला जाब विचारत होता. या सर्व घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी रोहित यादवा अटक केली. 


ब्रेकअप, सशंय अन् हत्या...  


रोहित यादव आणि आरती यादवचे गेल्या सहा वर्षांपासून  प्रेमसंबंध होते. आरती यादव ही वसईच्या चिंचपाडा परिसरातील कंपनीत कामाला होती. आरोपी रोहित यादव हा बेरोजगार होता. महिनाभरापूर्वीच दोघांचंही ब्रेकअप झालं होतं. आरतीचे दुसऱ्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय रोहितला होता. याच संशयातून रोहितने आरतीची हत्या केलीये. घटना जरी वसईत घडली असली तर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. 


ती उत्तर प्रदेशची, तो हरियाणाचा, 6 वर्षांपासून प्रेमसंबंध - 


हल्ल्यात मृत्यु झालेली 22 वर्षीय आरती यादव ही गाला नगर , आचोळे रोड, नालासोपारा (पूर्व) येथे राहत होती. ती मूळची राहणार उत्तर प्रदेशमधील होती. 32 वर्षीय आरोपी रोहीत यादव संतोष भुवन , नालासोपारा पूर्व येथील राहणार आहे. तो मूळचा  हरियाणातील राहणारा आहे. तो काही दिवसांपासून बेरोजगार होता. दोघांचे मागील सहा वर्षापासून प्रेम संबंध होते. गेल्या महिन्यात त्यांचं ब्रेकअप झालं होतं. त्यानंतर रोहितच्या डोक्यात संशयाचं भूत आलं. मुलाला मुलीच दुसरीकडे प्रेमसंबंध असल्याचा संशंय आला, त्यातून त्यानं लोखंडी पान्यानं हल्ला केला. त्यात आरतीचा मृत्यू झाला.  


बघ्यांच्या निष्क्रियतेमुळे माणुसकी मेली -


रोहित यादवचं कृत्य सैतानाला लाजवणारं आहे. मात्र रोहित बरोबरच या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींना देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करावं लागेल. कारण त्यांच्यातल्या चार जणांनी जरी धाडस दाखवलं असतं तर आज आरतीचा जीव वाचला असता. आरतीला वाचवण्यापेक्षा काही जणांनी तर तिच्या मृतदेहाजवळ जावून ती जिवंत आहे की तिचा मृत्यू झालाय याची पडताळणी करण्यात धन्यता मानली. रोहितच्या हल्ल्यात आरती मृत पावली तर बघ्यांच्या निष्क्रियतेमुळे माणुसकी मेली का? असा प्रश्न उपस्थित होतोय. 


मृताच्या बहिणीचा खळबळजनक खुलासा


वसई पूर्वेतील चिंचपाडा परिसरात आरती यादव हिचा भरदिवसा खून केल्याप्रकरणी तिच्या बहिणीने पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले असून शनिवारीही आरोपी रोहित यादव याने मृतकाला मारहाण करून तिचा मोबाईल फोडल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर फोन आल्याने मयत आणि तिची बहीण वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी गेले, मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याऐवजी पीडितेला आणि तिच्या बहिणीला आता आरोपी काही करणार नाही असे सांगून परत पाठवले. मृताच्या बहिणीच्या म्हणण्यानुसार, रविवारीही तिला व तिच्या बहिणीला पोलिसांनी तासंतास ताब्यात घेतले मात्र गुन्हा दाखल झाला नाही, त्याचाच परिणाम म्हणून आज आरोपींनी आरती यादव हिची हत्या केली.


आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल -


या धक्कादायक घटनेची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली. त्यांनी ट्वीट करत कारवाईचे आदेश दिले. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, वसईत एका तरुणीची भररस्त्यात हत्या झाल्याची घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांना या घटनेसंदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून, सखोल तपास करुन, न्यायालयात सुद्धा भक्कम पुराव्यानिशी बाजू मांडून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल, यादृष्टीने निर्देशित करण्यात आले आहे.






गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - 


विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी याप्रकरणाबाबत देवंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी ट्वीट करत सरकारवर निशाणा साधलाय. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, भर दिवसा एका तरुणीचा प्रियकराकडून निघृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज वसईत घडली. या घटनेवरून राज्यात मुली असुरक्षित असल्याचे पुन्हा सिद्ध झालं आहे.  त्यामुळे नैतिकता बाळगून गृहमंत्र्यांनी या पदाचा राजीनामा द्यावा. या घटनेतील आरोपीवर कठोर कारवाई व्हायलाच हवी.


रुपाली चाकणकर काय म्हणाल्या... ?


वसईमध्ये आज भर रस्त्यात तरुणाने मुलीवर वार करत तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपीला वालीव पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सुरू असून मी स्वतः वालीव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे,सखोल तपास करून आवश्यक ती कलमे जोडून ठोस दोषारोपपत्र पोलिसांनी करावे असे निर्देश देण्यात आले आहेत. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आयोग पाठपुरावा करेल.मुलांचे असे हिंसक वागणे,हत्या करण्यापर्यंत मजल जाणे आणि सोबतच अशी घटना घडत असताना लोकांनी बघ्याची भूमिका घेणे चिंताजनक आहे.