Mumbai Watermelon Family Death News : मुंबईतील पायधुनी परिसरात फूड पॉइझनिंगमुळे एका कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बिर्याणीनंतर या कुटुंबाने कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर त्यांना उलट्या आणि जुलाबचा त्रास सुरू झाला. या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता पोलिसांनी मोठी अपडेट दिली आहे. कुटुंबाने खाल्लेल्या कलिंगडाचे नमुने, तसेच त्यांच्या शरिरातील नमुने घेण्यात आले असून मृत्यूचं नेमकं कारण काय याचा तपास सुरू असल्याचं पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी सांगितलं. 

Continues below advertisement

मृत्यूपूर्वी कुटुंबातील एका व्यक्तीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं होतं की, त्यांनी सर्वांनी एकत्रितपणे आधी बिर्याणी खाल्ली आणि त्यानंतर कलिंगड खाल्लं होतं. या प्रकरणात पोलिसांच्या मते, मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टेम अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. अब्दुल्ला डोकाडिया, नसरीन डोकाडिया आणि त्यांच्या मुली आयशा आणि झैनब अशी मृतांची नावं आहेत.

Watermelon Death News : शरिराचे नमुने गोळा केले

या प्रकरणी परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे म्हणाले की, "जे जे मार्ग पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि त्यांच्या दोन मुली अशा चौघांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबाने त्यांच्या इतर नातेवाईकांसह 25 तारखेच्या रात्री दहाच्या दरम्यान एकत्र जेवण केलं होतं. रात्री एक-दीडच्या सुमारास त्यांनी कलिंगड खाल्लं अशी माहिती आहे. त्यानंतर त्यांना उलट्या, जुलाबचा त्रास होऊ लागला असता त्यांना जे जे रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या खाद्यपदार्थांचे, तसेच कलिंगडाचे नमुने  हस्तगत केले आहेत. शविच्छेदन झालं असून पुढील तपासणीसाठी शरिराचे नमुने (व्हिसेरा) घेण्यात आले आहेत. आता या अपघाताची चौकशी सुरू आहे."

Continues below advertisement

Mumbai Family Death : नेमकं काय घडलं?

मुंबईतील पायधुनी परिसरात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. डोकाडिया कुटुंबातील चारही सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे .प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री या कुटुंबात बिर्याणीचा बेत होता. चौघांनी एकत्र जेवण केल्यानंतर रात्रीच्या सुमारास त्यांनी कलिंगडही खाल्लं. मात्र, कलिंगड खाल्ल्यानंतर काही वेळातच चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला.

प्रकृती झपाट्याने खालावत गेल्याने चौघेही घरातच बेशुद्ध पडले. यानंतर तातडीने डॉक्टर कुरेशी यांना बोलावण्यात आलं. डॉक्टर घटनास्थळी पोहोचले तेव्हा चौघेही बेशुद्ध अवस्थेत होते .त्यानंतर सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनीही त्यावेळी त्यांच्या प्रकृतीची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचं सांगितलं.

दुर्दैवाने, उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू झाला. या घटनेमागे फूड पॉइझनिंगचं कारण असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला, तरी नेमकं कारण काय याबाबत अजूनही स्पष्टता नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृत्यूचं नेमकं कारण समोर येणार आहे. कलिंगडामुळे फूड पॉइझनिंग झालं की आणखी काही वेगळं कारण आहे, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ही बातमी वाचा: