Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Mumbai Crime Vikhroli Parksite: विक्रोळी पार्कसाईटमध्ये रात्री दोन वाजता रक्तरंजित थरार, भावांनीच भावाला संपवलं, राहुल नगरमध्ये काय घडलं? अंगावर काटा आणणारी घटना

Mumbai Crime Vikhroli Parksite: मुंबईच्या पूर्व उपनगरातील विक्रोळी पार्कसाईट परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी असणाऱ्या राहुल नगर (Rahul Nagar) येथे एकाच कुटुंबातील तीन भावांमध्ये वाद होऊन दोन भावांनी एका भावाच्या अख्ख्या कुटुंबावर धारदार शस्त्राने वार (Murder news) केले. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. बुधवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घरात मोठ्या आवाजात गाणी लावण्यावरुन या वादाला सुरुवात झाली. त्यानंतर शाब्दिक बाचाबाचीचे पर्यवसान मारामारीत झाले. राहुल नगरमध्ये घडलेल्या या थरारक घटनेबाबत स्थानिकांनी 'एबीपी माझा'ला अंगावर काटा आणणारी माहिती दिली. (Vikhroli Murder news)
राहुल नगरमध्ये वास्तव्याला असणाऱ्या विश्वकर्मा कुटुंबाच्या घरात ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या माहितीनुसार, रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मोठा आवाज झाला. विश्वकर्मा यांच्या घरात भांडण सुरु होते. त्यावेळी मयत सुनील विश्वकर्मा (वय 40) यांची पत्नी अंजू विश्वकर्मा रक्ताने माखलेल्या अवस्थेत घराबाहेर आली. ती भीतीने थरथर कापत होती. तिच्या तोंडातूनही शब्द बाहेर फुटत नव्हता. हा सगळा प्रकार बघून राहुल नगरमध्ये दहीहंडीचा सराव करत असलेल्या मुलांना आणि इतर नागरिकांना परिस्थितीचा अंदाज आला. दहीहंडीचा सराव करुन घरी परतणारी काही मुलं सुनील विश्वकर्मा यांना वाचवायला घरात गेली. मात्र, सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा यांनी धारदार शस्त्रांनी या मुलांवरही हल्ला केला. त्यामध्ये महादेव मगर या मुलाच्या हाताला दुखापत झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
एका मुलाने दिलेल्या माहितीनुसार, सूरज विश्वकर्मा मर्डर करुन बाहेर आला होता. त्यांनी घरातील लाईट बंद केली होती. तो अंजू विश्वकर्मा यांना शोधायला घराबाहेर आला होता. मुलांनी तिला वाचवलं नसतं तर तिलाही सूरज आणि सुरेंद्र यांनी ठार मारले असते. या सगळ्यानंतरही आम्ही घरात गेलो तेव्हा तिथे अंधार होता. त्या अंधारात आमच्यावर हल्ला झाला. आम्हाला काहीच दिसत नव्हते त्यामुळे आम्ही पळून घराबाहेर आलो. त्यानंतर सूरज आणि सुरेंद्र दोघेही धारदार शस्त्र घेऊन घराबाहेर आले. आमच्यासमोर त्यांनी अंजू विश्वकर्मा यांना मारहाण सुरु केली. त्यांच्यावर चाकूने तीन-चारवेळा वार केले. त्यामुळे अंजू विश्वकर्मा जबर जखमी झाल्या. आम्ही नंतर घरात शिरलो तेव्हा सुनील विश्वकर्मा यांचा मुलगा मरुन पडला होता, असे प्रत्यक्षदर्शींपैकी एकाने सांगितले.
Crime news: राहुल नगरमध्ये नेमकं काय घडलं?
विश्वकर्मा कुटुंबातील चार सख्खे भाऊ एकाच घरात राहत होते. यापैकी दोघेजण घराच्या पोटमाळ्यावर राहत होते. यापैकी सुनील विश्वकर्मा (वय 40) यांनी घरात पहाटे मोठ्या आवाजात गाणी लावली होती. यावरुन त्यांचे दोन भाऊ सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा यांनी सुनील यांना जाब विचारला. यावरुन सुनील विश्वकर्मा आणि दोन भावांची शाब्दिक बाचाबाची झाली. ही बाचाबाची इतकी टोकाला गेली की या सगळ्यांची हाणामारी सुरु झाली. त्यावेळी सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा यांनी सुनील विश्वकर्मा आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये सुनील विश्वकर्मा यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा 14 वर्षांचा मुलगा श्लोक विश्वकर्मा याला रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याने जीव सोडला. सुनील विश्वकर्मा यांची पत्नी अंजू विश्वकर्मा आणि लहान मुलगा विवान विश्वकर्मा हे दोघे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आणखी वाचा





















