Mumbai Crime : मुंबईतील कांदिवली (kandivali) पश्चिम परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी झाली. लालजीपाडा (Laljipada) येथील यादव आणि चव्हाण कुटुंबीयांमध्ये जागेच्या ताब्यासंदर्भातील वाद इतका वाढला की, त्याचे पर्यवसान हिंसक संघर्षात झाले. या मारामारीत एक 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून, आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
जागेचा ताबा विवादाचं कारण
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार यादव आणि चव्हाण कुटुंबीयांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रॉपर्टीवरून वाद सुरू होता. या वादातूनच दोन्ही कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये बॅट, हॉकी स्टिक, लाकडी काठ्या, विटा आणि दगडांचा वापर करण्यात आला.
आठ जण गंभीर जखमी
या हिंसाचारात आठ जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान राम लखन यादव (वय 65) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून, इतर आरोपी फरार आहेत. पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण
घटनेनंतर लालजीपाडा परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता या घटनेतील फरार आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश कधी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या