Mumbai Crime : मुंबईत हत्येच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. वांद्रेत (Bandra) दर्ग्याच्या जागेच्या मालकी हक्कावरून 46 वर्षीय व्यक्तीचा निर्घुण खून करण्यात आला आहे. तर नागपाडा (Nagpada) येथे पूर्व वैमनस्यातून मेहुण्यानेच बहिणीच्या नवऱ्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे मुंबईमध्ये (Mumbai Crime News) एकच खळबळ उडाली आहे.
जागेच्या मालकी हक्कावरून एकाला संपवलं
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रेत दर्ग्याच्या जागेच्या मालकी हक्कावरून 46 वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली. गुरूवारी सायंकाळी शाकिर अली शेख या व्यक्तीची चार जणांनी धारदार शस्राने भोसकून हत्या केली. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमरान नासीर खान, उस्मानअली जाकिर अली शेख, जाकीर अली शेख, फातिमा उर्फ कायनात इमरान खान अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.
मेहुण्याने काढला बहिणीच्या नवऱ्याचा काटा
तर नागपाडा येथे पूर्व वैमनस्यातून मेव्हण्यानेच बहिणीच्या नवर्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. अजित खारवा हे त्यांचा 22 वर्षीय मुलगा अभय सोबत बोईसरहून गुरूवारी रात्री मोबाइल खरेदीसाठी नागपडा येथे आले होते. यावेळी अजितच्या समोर मेव्हणा विजय चतुर खारवा आणि त्याची मुले आली. पूर्व वैमनस्यातून दोघांमध्ये आधी शाब्दिक वाद झाला. त्यानंतर विजय खारवा व त्याच्या दोन मुलांनी अजितवर धारदार शस्त्रांनी सपसप वार केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अभयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
