Mumbai Crime News: वडाळा (Wadala) पश्चिमेकडील बाळकृष्ण सुळे मार्गावर असलेल्या एका बांधकाम साईटवर (Construction Site) अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. इमारतीमधील लिफ्टच्या डक्टमध्ये (Lift Duct) तोल जाऊन पडल्याने संजय लिंबुनस मिंज (वय 37) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. 10 सप्टेंबर रोजी पहाटे 1 ते 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी कंत्राटदाराच्या निष्काळजीपणावर बोट ठेवत माटुंगा पोलीस ठाण्यात (Matunga Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai Crime News: नेमकी घटना काय?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत संजय मिंज हे मुळात त्या बांधकाम साईटवर कामगार नव्हते. ते त्यांच्या दोन मित्रांसह तेथे काम करणाऱ्या आपल्या भाच्याला भेटण्यासाठी आले होते. 10 सप्टेंबरच्या रात्री हे चौघेही एकत्र जेवले आणि त्यानंतर इमारतीच्या सहाव्या मजल्यावर (Sixth Floor) झोपण्यासाठी गेले. मात्र, पहाटेच्या सुमारास संजय मिंज यांचा अचानक तोल गेला आणि ते सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नसलेल्या लिफ्टच्या डक्टमध्ये थेट खाली कोसळले. या भीषण अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
Mumbai Crime News: सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव आणि कंत्राटदारावर आरोप
घटनेची माहिती मिळताच माटुंगा पोलिसांनी (Matunga Police) घटनास्थळी धाव घेतली. प्रथमदर्शनी दिलेल्या माहितीनुसार आणि एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे, संबंधित कंत्राटदाराने कामगारांसाठी सुरक्षित लेबर कॅम्प उभारला नव्हता. तसेच बांधकाम साईटवर सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. अत्यंत धोकेदायक परिस्थितीत कामगारांना राहण्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Mumbai Crime News: माटुंगा पोलिसांत गुन्हा दाखल
या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर माटुंगा पोलिसांनी कंत्राटदाराविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 106 (1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास माटुंगा पोलीस करत आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
