Mumbai Crime News: मुंबईतील अंधेरी पूर्व, मरोळ (Marol) भागात एका व्यक्तीचा खासगी प्लॉट (Private Plot) बेकायदेशीरपणे कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अंधेरी तालुका अध्यक्ष आणि 'टायगर ग्रुप'चे (Tiger Group) मुंबई अध्यक्ष संजय खंडागळे (Sanjay Khandagale) याच्यासह 10 ते 15 जणांवर पवई पोलीस ठाण्यात (Powai Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संजय खंडागळे यांनी त्यांचा मित्र छोटा कन्ना, मोठा कन्ना आणि 10 ते 15 महिला-पुरुषांच्या टोळीला सोबत घेऊन संबंधित खासगी प्लॉटवर जबरदस्तीने ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी प्लॉटच्या मूळ मालकाने दिलेल्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
Mumbai Crime News: टोळीची अंधेरी अन् आरे परिसरात मोठी दहशत
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय खंडागळे आणि कन्ना टोळीकडून मुंबईच्या अंधेरी (Andheri) आणि गोरेगाव येथील आरे कॉलनी (Aarey Colony) परिसरात प्रचंड दहशत पसरवली जात आहे. ही टोळी थेट लोकांच्या घरात घुसून घरे खाली करणे आणि मोकळे प्लॉट बळकावणे असे प्रकार सर्रास करत असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे.
Mumbai Crime News: आरोपींवर आधीपासूनच अनेक गंभीर गुन्हे दाखल
या टोळीतील मुख्य सूत्रधार संजय खंडागळे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. तर त्याचा साथीदार छोटा कन्ना याच्यावर 10 गुन्हे आणि मोठा कन्ना याच्यावर हत्या तसेच हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी 14 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत नोंदवण्यात आले आहेत. या टोळीला स्थानिक राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्यामुळेच त्यांचे धाडस वाढले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या दहशतीमुळे अंधेरी आणि आरे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Mumbai Crime News: पोलीस प्रशासनाचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
या टोळीने अशाच प्रकारे आजवर अनेकांची घरे आणि जमिनी बळकावल्या असल्याचा संशय पोलीस प्रशासनाला आहे. त्यामुळे जर या टोळीकडून कोणाची फसवणूक झाली असेल किंवा कोणाची जागा बळकावली गेली असेल, तर त्यांनी न घाबरता तात्काळ पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन पवई पोलिसांकडून करण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पवई पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून विविध तांत्रिक व प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे पुढील तपास वेगाने सुरू केला आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
