मुंबई :  एका किरकोळ वादातून मारहाण झालेल्या प्रवाशाला आपले प्राण गमवण्याची दुर्देवी वेळ आली. मारहाणीमुळे रेल्वे रुळावर पडलेल्या प्रवाशाला धावत्या लोकलने उडवले. या प्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी (Dadar Railway Police) आरोपी पती-पत्नीला अटक केली आहे. रविवारी, 13 ऑगस्ट रोजी, मुंबईतील शीव रेल्वे (Sion Railway Station) स्थानकावर ही घटना घडली. दिनेश राठोड ( 26 वर्ष) असे या मृत प्रवाशाचे नाव आहे.


मुंबईतील लोकल ट्रेन स्थानकावर गर्दी असते. यामध्ये अनेक प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागतो. अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात, काही वेळेस प्रवाशांमध्ये वादावादी होते. हीच वादावादी आणि त्यानंतर झालेली मारहाण 26 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतली. शीव रेल्वे स्थानकावर रविवारी, 13 ऑगस्ट रोजी दिनेश राठोड या प्रवाशाचा एका महिलेला धक्का लागला. हा धक्का चुकीच्या पद्धतीने लावला असल्याचा आरोप करत पती-पत्नीने राठोड याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत राठोड रेल्वे रुळावर पडला. दुर्देवाने त्याच वेळी, माटुंगा स्थानकावरून आलेल्या लोकलने दिनेश राठोडला उडवले. या अपघातात जखमी झालेल्या दिनेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. 


मृत प्रवाशी दिनेश राठोड हा बेस्टमध्ये वाहक पदावर काम करत होता. या प्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी अविनाश माने (31 वर्ष) आणि त्याची पत्नी  शीतल माने (30 वर्ष) यांना अटक केली. दोन्ही आरोपी कोल्हापूरमधील रहिवासी असून त्यांना मंगळवारी दादर रेल्वे पोलिसांनी अटक केली. 


नेमकं काय झालं? 


पोलिसांच्या तपासानुसार, दिनेश राठोड हा जिन्यावरून फलाट क्रमांक 1 वर आला. त्यावेळी शीतल माने या महिलेला त्याचा धक्का लागला. त्यानंतर महिलेने त्याला छत्रीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीने राठोडला मारहाण केली. त्यानंतर तो रुळांवर पडला. रुळावर पडलेल्या दिनेश राठोडने फलाटावर येण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत त्याला लोकलने धडक दिली.




आरोपींना अटक 


या घटने प्रकरणी दादर रेल्वे पोलिसांकडे अपमृत्यूची नोंद झाली होती. पोलिसांच्या तपासात पुढे मारहाणीचा प्रकार निष्पन झाले. त्यानंतर पोलिसांनी सदोष मनुष्यवध केल्याच्या आरोपाखाली पती-पत्नींना अटक केली. याप्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी भारतीय दंड विधी कलम 304 (2) आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: