Mumbai Crime News : मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या एका दिवसाच्या मुलाला आईने एक लाख रूपयांमध्ये विकले आहे. या प्रकरणी बाळाची खरेदी करणाऱ्या नर्ससह पोलिसांनी आईला बेड्या ठोकल्या आहेत. दोघींचीही पोलिस चौकशी करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाची खरेदी करणारी महिला ही पेशाने नर्स आहे. तर, मुलाची विक्री करणारी संशयित आई ही कोणतंही काम करत नव्हती. बाळाला जन्म दिल्यानंतर लगेच त्याची विक्री करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून ती माहिती मिळवत होती. माहिती मिळवत असताना तीचा संशयित आरोपी नर्ससोबत संपर्क झाला. या बाळाला मी विकत घेऊन असे सांगून संशयित महिलेच्या प्रसुतीनंतर दुसऱ्याच दिवशी नर्सने ते बाळ एक लाख रूपयांमध्ये विकत घेतले. या दोघींचा संपर्क झाल्यानंतर नर्स देखील बाळाची विक्री करण्यासाठी पुढे ग्राहक शोधत होती. ही माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.
माहिती मिळाल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने पाळत ठेवत सापळा रचला आणि संबंधित नर्स आणि आईला बेड्या ठोकल्या. दोघींवरही आपीसी कलम 370 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघींना देखील बेड्या ठोकल्या आहेत.
बाळाची खरेदी करणारी नर्स आणि विक्री करणाऱ्या आईला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या दोघींना फक्त आताच हा गुन्हा केलाय की, मुलांची विक्री करण्याचं काही रॅकेट आहे? याची पोलिस कसून चौकशी करत आहेत, अशी माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली.
पोटच्या मुलाची किंमत एक लाख रूपये
स्वत:च्या पोटच्या मुलाची एक लाख रूपये किंमत करून विकणाऱ्या आईकडे पोलिस कसून चौकशी करत आहेत. कारण अशी कोणती परिस्थिती उद्धभवली की तिला आपलं फक्त एका दिवसाच्या बाळाची एक लाख रूपयांमध्ये विक्री करण्याची वेळ आली.
असा लावला तपास
संशयित आईने नर्ससोबत मुलगा विक्रीसाठी संपर्क साधल्यानंतर ते मुल पुढे विक्री करण्यासाठी नर्स ग्राहकाच्या शोधात होती. तिने अनेकांना यासाठी संपर्क देखील साधला होता. ही माहिती मिळाल्यानंत मुंबई गुन्हे शाखेच्या सहा नंबर पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आलं. एपीआय सचिन गावडे हे या पथकाचे प्रमुख होते. गावडे आणि त्यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित नर्स आणि संशयित आईला बेड्या ठोकल्या. दोघींनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.