Mumbai Local Train: गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या भांडणात प्रवाशांनी एकमेकांवर जीवघेणे हल्ले केल्याचे काही प्रकार समोर आले होते. यामुळे लोकल ट्रेनमधील (Mumbai Local Train) सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. ही सगळी चर्चा सुरु असतानाच आता मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये आणखी एक संतापजनक घटना घडली आहे. ट्रेनमध्ये पुरुषांच्या डब्यात पुरुष प्रवाशाने एका महिलेला मारहाण केली. हा सगळा प्रकार सुरु असताना आजुबाजूचे पुरुष सहप्रवासी थंडपणे बसून राहिले होते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या प्रकाराबाबत सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. (Mumbai Crime news)
प्राथमिक माहितीनुसार, हा व्हिडीओ लोकल ट्रेनच्या पुरुषांच्या डब्यातील आहे. ही महिला ट्रेनच्या डब्यातील सीटवर झोपली होती. त्यावरुन वाद झाल्यानंतर या पुरुष प्रवाशाने तिला मारहाण केली. तो तिला अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळही करत आहे. संबंधित पुरुष प्रवाशाने कमरेचा पट्टा काढून त्यानेही मारण्याचा धाक महिलेला दाखवला. हा सर्व प्रकार सुरु असताना आजुबाजूला अनेक पुरुष प्रवाशी बसून होते. मात्र, यापैकी एकानेही या पुरुषाला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. हा प्रकार नक्की कोणत्या लोकल ट्रेनमध्ये घडला होता, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, आता व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांकडून संबंधित पुरुष प्रवाशाला पकडून त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
Central Railway Thane: महिलांच्या डब्यात साप दिसल्याची माहिती; ठाणे स्थानकावर लोकल 12 मिनिटे खोळंबली
ठाणे स्थानकावर महिलांच्या डब्यात साप दिसल्याने मध्य रेल्वे मार्गावर लोकल ट्रेनचा खोळंबा झाल्याची घटना घडली आहे. महिलांच्या डब्यात साप दिसल्यानंतर काही महिलांनी अलार्म चेन पुलिंग केल्याने लोकल तातडीने थांबवली गेली. परिणामी सकाळी 9.14 ते 9.26 या वेळेत लोकल 12 मिनिटे थांबून होती. गाडी ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरुन सुटल्यानंतर ही घटना घडली. साप सापडल्याच्या वृत्तानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी महिलांच्या डब्याची तातडीने तपासणी केली. तपासणीनंतर परिस्थिती सुरक्षित असल्याची खात्री करून लोकल पुढे रवाना करण्यात आली.
या घटनेमुळे काही काळ प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, डब्यात काहीच न सापडल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. या प्रकाराचा काही लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर किरकोळ परिणाम झाला आहे. साप प्रत्यक्षात आढळला का, याबाबत रेल्वेकडून अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
आणखी वाचा
