Mumbai Crime News:मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील (Andheri East) एमआयडीसी (MIDC) परिसरात माथाडी कामगारांच्या (Mathadi Workers) नावाखाली दहशत निर्माण करून खंडणी उकळणाऱ्या एका संघटित गुन्हेगारी टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) पर्दाफाश केला आहे. या टोळीचा मुख्य प्रमुख कन्नन चिन्नादुराई वन्नियार ऊर्फ 'बडा कन्ना' (Bada Kanna) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  अंधेरी आणि उपनगरातील उद्योग, बांधकाम व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरवणाऱ्या या टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये कडक कारवाई केली आहे.

Continues below advertisement

Mumbai Crime News: 'ये इलाका हमारा है...' म्हणत उघडपणे धमकी

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, 'सत्या आणि कन्ना' टोळीचे गुंड अंधेरी परिसरात उघडपणे दादागिरी करत होते. "ये इलाका हमारा है... यहाँ काम करना है, तो हर महीने 20 हजार रुपये हफ्ता देना पडेगा!" अशा शब्दांत धमकावून हे गुंड व्यावसायिकांकडून वाराई किंवा प्रोटेक्शन मनीची जबरदस्तीने मागणी करत असत.

काही दिवसांपूर्वी अंधेरी पूर्वेतील कोंडीविटा रोडवर माथाडी युनियनच्या नावाने एका व्यक्तीला लाकडी दांडक्याने डोक्यात आणि पायावर जीवघेणी मारहाण करण्यात आली होती. भरदिवसा घडलेल्या या मारहाणीचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी 17 ऑगस्ट 2026 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Continues below advertisement

Mumbai Crime News: 7 आरोपी अटकेत, दुसरा म्होरक्या फरार

एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणात आधीच 7 आरोपींना अटक केली होती, मात्र टोळीचा मुख्य सूत्रधार बडा कन्ना फरार होता. आता पोलिसांनी त्याला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. तर या टोळीचा दुसरा प्रमुख सत्यम गुरुखेल ऊर्फ सत्या आणि त्याचे अन्य 3 साथीदार अजूनही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Mumbai Crime News: 'मकोका'अंतर्गत गुन्ह्यात वाढ; राजकीय वरदहस्ताचा आरोप

आरोपींनी माथाडी कामगार टोळीच्या नावाखाली बेकायदेशीर कृत्यांसाठी संघटित टोळी स्थापन केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या टोळीविरोधात यापूर्वीही हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि जबरदस्तीने दुखापत करण्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सक्षम अधिकाऱ्यांची पूर्वमंजुरी मिळाल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात मकोकाच्या कलम 3(1)(ii), 3(2), आणि 3(4) अन्वये वाढ केली आहे.

दरम्‍यान, या टोळीचे राजकीय नेत्यांशी निकटचे संबंध असल्यामुळे त्यांच्या मनातील पोलिसांची भीती संपली होती, असा आरोप स्थानिक अंधेरीकरांकडून केला जात होता. मात्र, एमआयडीसी पोलिसांनी मकोकाअंतर्गत थेट कारवाई करून या टोळीला मोठा दणका दिला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Ramesh Kadam: मातंग समाजाच्या निर्धार मोर्चाला जाण्यापूर्वीच रमेश कदम स्थानबद्ध; म्हणाले, 'स्वतंत्र आरक्षणाच्या न्यायासाठी...'