मुंबई: उत्तर प्रदेशात बेपत्ता असलेल्या तरुणीचा शोध मुंबई गुन्हे शाखा 3 च्या पथकाने अवघ्या एका दिवसात घेतला. लग्नाचा तगादा लावत असल्याने प्रियकरानेच तिची हत्या केल्याचं उघड झालं. उत्तर प्रदेशात बेपत्ता असलेल्या तरुणीला शोधण्यासाठी यूपी पोलिस मुंबईत आल्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्याचा शोध लावला. 

वसईतील गिरीज येथे राहणारा 28 वर्षीय आरोपी अमित सुग्रीव सिंह याचे उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील कुडाघट झरना टोला या गावातील प्रिया शंभुनाथ सिंह या 25 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबध जुळले होते. प्रिया अधून मधून अमितला भेटण्यासाठी वसईला यायची. 16 डिसेंबर 2024 रोजी ती उत्तरप्रदेशातून अमितला भेटण्यासाठी वसईला आली होती. पण त्यानंतर ती तिच्या घराकडे परतलीच नाही. 

उत्तर प्रदेशात मिसिंगचा गुन्हा दाखल

प्रियाच्या घरच्यांनी गोरखपूर येथील एम्स पोलिस ठाण्यात 29 डिसेंबर 2024 ला मिसिंगचा गुन्हा दाखल केला होता. एम्स पोलिसांना तिच्या मोबाईलच लोकेशन वसई मिळालं होतं. त्यामुळे गोरखपूरच्या पोलिसांनी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे यांची भेट घेतली. अंबुरे यांनी गुन्हे शाखा 3 च्या युनिटला मिसिंग तरुणीचा शोध घेण्याची सूचना दिल्या. 

लग्नासाठी तगादा लावल्यानेच काटा काढला

गुन्हे शाखेला ती तरुणी वसईला अमितला भेटण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली. अमितची चौकशी केल्यानंतर त्यांने गुन्हा कबूल केला. मयत तरुणी ही अमितकडे लग्नासाठी तगादा लावत होती. मात्र या दोघांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. त्यामुळेच अमितने प्रियाला संपवण्याचा बेत आखला. 

नाताळच्या दिवशी, 25 डिसेंबरला वसईकर आनंदोत्सव साजरे करत असताना, नाताळ दाखवण्याच्या बाहण्याने रात्रीच्या वेळी प्रियाला घेवून अमित वसईच्या पोमण येथील महाजन पाड्यातील रॉयल पार्क इंडस्ट्रीजवळील मोकळ्या परिसरात घेवून गेला. त्या ठिकाणी रात्री 11 वाजता तिचा गळा दाबून तिला ठार मारुन टाकलं आणि तिचा मृतदेह बाजूच्या नाल्यात फेकून दिलं. 

प्रिया ही वसईहून दिल्लीच्या दिशेने गेल्याचा बनाव आखण्यासाठी त्याने प्रियाचा मोबाईल एखाद्या पिक्चराला शोभेल अशा पद्धतीने वसई येथून दिल्लीत जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेस ट्रेनमध्ये ठेवून दिला होता. मात्र उत्तरप्रदेश पोलिस आणि मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने उत्कृष्ट तपास करत प्रियाच्या गुन्हेगाराला अखेर जेरबंद करण्यात यश मिळवलं. 

ही बातमी वाचा: