Mumbai Crime : कुर्ल्यात (Kurla) कौटुंबिक वादातून बापानेच चार वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी व्हीबी नगर पोलिसांनी (Police) आरोपी बापावर गुन्हा दाखल करण्यात आला असून परवेज सिद्धीकी याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, परवेज सिद्धीकी याचा शनिवारी दुपारी पत्नी सबा यांच्यासोबत वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने राग अनावर झालेल्या परवेजने पत्नी सबाला जबर मारहाण केली होती. त्यानंतर त्याने चार वर्षीय मुलगी आफिया हिला जमिनीवर आपटले.
चार वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
यात मुलगी गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी भाभा रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी व्ही बी नगर पोलिसांनी परवेज याच्यावर कलम गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
अंधेरीत मित्रानेच केली मित्राची हत्या
दरम्यान, अंधेरीत किरकोळ वादातून शेजारी राहणाऱ्या मित्रानेच मित्राचीच हत्या केल्याची घटना घडली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सुजीत हरिवंश सिंह असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर सुनील परशुराम कोकाटे असे आरोपीचे नाव आहे. सुजीत आणि सुनील दोघेही शेजारी शेजारी राहत होते आणि एकमेकांचे चांगले मित्र होते. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये किरकोळ कारणातून वाद झाला. हा वाद पुन्हा उफाळून आला. सुनीलने रस्त्यात गाठले. यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वाद टोकाला गेला आणि सुनीलने सुजीतवर चाकूने हल्ला केला. यात सुजीत हरिवंश सिंह याचा मृत्यू झालाय. सुनील परशुराम कोकाटे याला पोलिसांनी अटक केली आहे.
जन्मदात्या आईने दोन चिमुकल्यांचा जीव घेतला
घरगुती वादातून जन्मदात्या आईने आपल्या दोन चिमुकल्यांचा गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली आहे. सोबतच महिलेने आपल्या पतीवरही कोयत्याने वार केलेत. पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये 8 फेब्रुवारीला ही घटना घडली. कोमल दुर्योधन मिंढे (वय, 30) असे या महिलेचे नाव असून तिला पोलिसांनी अटक केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
