Mumbai Crime Family death Pydhonie:मुंबईच्या पायधुनी परिसरात काही दिवसांपूर्वी एका कुटुंबाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. पायधुनीच्या घाटी मोहल्ल्यातील मोगल उमरेट्टी इमारतीमध्ये ही घटना घडली होती. अब्दुल्ला डोकाडिया (40), नसरीन डोकाडिया (35) आणि त्यांच्या मुली आयशा (16) व झैनब (13) अशी मृतांची नावे आहेत. या चौघांना विषबाधा झाली होती आणि उलट्या-जुलाब होऊन या सगळ्यांचा मृत्यू झाला होता. या सगळ्यांच्या मृत्यूपर्वी त्यांच्या घरी नातेवाईक आले होते. या सगळ्यांनी मिळून बिर्याणी खाल्ली होती. सगळे नातेवाईक घरी गेल्यानंतर डोकाडिया कुटुंबाने कलिंगड (Watermelon) खाल्ले होते. याच कलिंगडातून त्यांना विषबाधा (Food Poison) झाली असावी, असा अंदाज सुरुवातीला व्यक्त करण्यात आला होता. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या फॉरेन्सिक अहवालात या चौघांचा मृत्यू कलिंगड किंवा बिर्याणीतील विषबाधेमुळे नव्हे तर विषारी पदार्थामुळे झाल्याचे स्पष्ट झाले होते. या चौघांच्या अंतर्गत अवयवांमध्ये (यकृत, मूत्रपिंड, प्लीहा यांचे नमुने), पोटातील अन्न, पित्त आणि पोटातील चरबीच्या नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फाइड आढळून आले होते. तसेच घरात आढळलेल्या कलिंगडातही झिंक फॉस्फाइड आढळून आले होते. हे झिंक फॉस्फाईड उंदीर मारण्याच्या औषधात असते. (Mumbai Crime news)
याप्रकरणात आता आणखी एक नवीन अपडेट समोर आली आहे. डोकाडिया कुटुंब राहत असलेल्या घरातून उंदीर मारण्याचे औषध सापडले आहे. उंदीर मारण्याच्या दोन वड्या आणि उंदीर मारण्याचा स्प्रे घरातून जप्त करण्यात आला आहे. उंदीर मारण्याच्या वड्यांच पाकीट सीलबंद अवस्थेत असून स्प्रेचा वापर झाल्याचे तपासात समोर आले आहे. मुघल बिल्डिंगमध्ये मोठ्याप्रमाणावर उंदीर आहेत. डोकाडिया कुटुंबातील चौघांचाही मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधाने झाल्याचे एफएसएलच्या चाचणीत समोर आले आहे.
हे औषध डोकाडिया कुटुंबाच्या शरीरात कसे गेले, हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही. त्यामुळे हा घातपात असावा की आत्महत्या अशी चर्चाही रंगली आहे. अब्दुल्ला व आयेशा यांचा उपचारादरम्यान जबाब नोंदविण्यात आला होता. त्यांनीही बिर्याणी नंतर कलिंगड खाल्ल्याचे म्हटले होते. तसेच आत्महत्या करत असल्याबाबत किंवा कुणावर संशय व्यक्त करणारी काहीही माहिती त्यामधून समोर आलेली नव्हती. जे. जे. मार्ग पोलिसांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत केलेल्या तपासात कुठलीही संशयास्पद बाब समोर आलेली नाही.
Mumbai Watermelon Case : 'त्या' 11 नमुन्यांमध्येही काहीच नाही
एफडीएच्या रिपोर्टमध्येही अधिकाऱ्यांनी डोकाडियांच्या घरातील वेगवेगळ्या 11 पदार्थांचे नमुने घेतलेले होते. यामध्ये रात्रीची बिर्याणी, कलिंगडाचे तुकडे, फ्रीजमधील पाणी, तांदूळ, चिकन, खजूर आणि मसाल्यांचा समावेश होता. या सर्व पदार्थामध्ये कोणतेही विषारी द्रव्य आढळून आले नव्हते.
आणखी वाचा
