मुंबई: शहरातील चारकोप परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या तीस रुपयांसाठी मेडिकल दुकानातील कर्मचाऱ्याला चार-पाच जणांकडून बेदम मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज वायरल झाल्यानंतर चारकोप पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणाऱ्या सर्वांना पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डहाणूकरवाडी असर मेडिकल शॉपमध्ये एक मुलगा औषध विकत घेण्यासाठी आला. औषध विकत घेतल्यानंतर त्याने गुगल पे द्वारा औषधाचे बिल दुकानदाराला दिले. तीस रुपये जास्त दिल्याचे दुकानदाराच्या लक्षात आणून देत तरुणाने पैशाची मागणी केली. कर्मचाऱ्यांची खात्री झाल्यानंतर त्याने 30 रुपये औषध खरेदी करणाऱ्याला परत केले. मात्र यांच्यात काही बाचाबाची झाली. यानंतर रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास त्या मुलाने त्याचे आई-वडील आणि इतर कुटुंबीयांना सोबत घेऊन येत मेडिकल दुकानातील कर्मचाऱ्याला मारहाण केली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ही मारहाण स्पष्टपणे दिसत आहे.

यानंतर चारकोप पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या सर्व व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चारकोप पोलिसांनी आयपीसी कलम 324, 427,323,504,34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सुनील सुरेश पवार (24), सुरेश पवार (50) आणि नीलम पवार (48) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी यांना नोटीस पाठवली आहे. पुढील तपास चारकोप पोलीस करत आहेत.