मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai) जगभरातून प्रवासी, पर्यटक, उद्योजक येतात. त्यामुळे, मुंबई विमानतळावर पोलिसांचा आणि कस्टम विभागाचा कडा पहारा असतो. त्याच कस्टम विभागाने मुंबई विमानतळावरुन (Airport) तब्बल 2.26 कोटींचे सोने (Gold) जप्त केले असून यात दोघांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी देखील मुंबई विमानतळावरुन अंमली पदार्थ आणि सोनं, मौल्यवान वस्तुंची तस्करी होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यावेळी देखील पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली. तर, ठाण्यातून तब्बल 11 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम्स विभागाने मोठी कारवाई केली असून 16 आणि 17 नोव्हेंबरच्या मध्यरात्री एअर इंटेलिजन्स युनिटने चार वेगवेगळ्या प्रकरणांत कारवाई केली. त्यामध्ये, एकूण 1 किलो 910 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आले आहे. कस्टमने जप्त केलेल्या सोन्याची एकूण किंमत तब्बल 2.26 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. या सोन्याच्या वस्तूंमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या विटा आणि सोन्याचे तुकडे जप्त करण्यात आले आहेत.
इस्त्रीमध्ये लपवून सोन्याची तस्करी
आरोपींनी ब्लूटूथ स्पीकर आणि इलेक्ट्रिक इस्त्रीमध्येही लपवून सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कस्टम अधिकाऱ्यांच्या नजरेनं ते उघडकीस आणलं. याशिवाय २२ कॅरेटचे कच्चे सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले असून दोन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी, पुढील तपास सुरू आहे.
ठाण्यात 11 कोटींचे कोकेन जप्त
ठाणे जिल्ह्यातील अंमली पदार्थ तस्करीविरोधात मुंब्रा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दिवा पूर्वेकडील बेतवडे गावातील मॅरेथॉन नेक्सवर्ल्ड सोसायटीत छापा टाकत पोलिसांनी तब्बल 11 कोटी रुपये किमतीचे कोकेन आणि मेफेड्रोन अर्थात एमडी जप्त केले आहे. या कारवाईत दोन नायजेरियन नागरिकांसह एका टांझानियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. मुंब्रा पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाला बेतवडे परिसरातील एका सोसायटीत परदेशी नागरिकांकडून अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावदवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ढगे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने मॅरेथॉन नेक्सवर्ल्ड सोसायटीतील औरा इमारतीच्या ३६ व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 3602 वर छापा टाकला.
दोन नायजेरिन नागरिकांना अटक
पंच आणि फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत घराची झडती घेतली असता फ्रिजवर ठेवलेल्या प्लास्टिकच्या डब्यात विविध पिशव्यांमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आढळून आली. तपासणीत ही पावडर कोकेन आणि एमडी असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तब्बल 2 किलो 278 ग्रॅमपेक्षा अधिक अंमली पदार्थांसह रिकामे प्लास्टिक पाऊच, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, दोन मोबाईल फोन, पासपोर्ट आणि रोख रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणी नायजेरियन नागरिक चुकवुएमेका इमॅन्युएल न्वाक्वो आणि त्याची पत्नी युकेरिया चुकवुएमेका ओबियानुजु या दोघांना अटक करण्यात आली असून, एका टांझानियन नागरिकालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या संपूर्ण कारवाईची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, दिवा परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या ड्रग्जचा पुरवठा नेमका कुठून होत होता? या तस्करीमागे आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत आहे का? तसेच या नेटवर्कचे स्थानिक कनेक्शन कोणाशी आहे? याचा तपास आता मुंब्रा पोलीस करत आहेत.
हेही वाचा
भाजपा कार्यकर्त्याची माघार, जळगाव जिल्हा बँकेसाठी गिरीश महाजन बिनविरोध; गुलाबराव पाटीलही जिंकले
