Mangalwedha Crime News: विवाहित प्रेयसीला घरातून पळवलं, वेडसर महिलेला जाळलं; मंगळवेढ्यातील 'दृश्यम' चित्रपटाला लाजवणारी क्राईम स्टोरी
Pandharpur crime extra marital affair: रात्री अडीचच्या सुमाराला गवताची गंजी पेटवण्यापूर्वी निशांत याने किरण हिला घरातून बाहेर बोलवून डाळिंबाच्या बागेत लपायला सांगितले.

Pandharpur Crime News: पंढरपूर जिल्ह्यातील दीर-भावजई यांच्यातील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. पंढरपूरच्या मंगळवेढा (Mangalwedha) तालुक्यातील पाठकळ येथे सावंत कुटुंबात हा प्रकार घडला. या कुटुंबातील किरण सावंत (वय 23) या विवाहित महिलेचे तिचा दीर निशांत सावंत (वय 20) याच्याशी अनैतिक संबंध होते. किरणचा नवरा नागेश याला या सगळ्याची माहिती नव्हती. किरण (Kiran Sawant) आणि तिचा दीर निशांत (Nishant Sawant) या दोघांना सगळ्यांपासून दूर जाऊन स्वत:चा नवा संसार सुरु करायचा होता. त्यासाठी या दोघांनी मिळून एक भयानक कट रचला. किरण हिने आत्महत्या केली याचा बनाव रचण्यासाठी या दोघांनी दुसऱ्याच एका महिलेला जाळले. जेणेकरुन सावंत कुटुंबीयांनी किरणचा शोध घेतला नसता. मात्र, मोबाईल फोनमुळे पोलिसांना संशय आला आणि किरण व निशांतने रचलेल्या भयानक कटाचा पर्दाफाश झाला.
किरण सावंत हिने जाळून घेऊन आत्महत्या केली याची सर्वांना खात्री पटावी, यासाठी निशांत सावंत याने पंढरपूरमध्ये रस्त्यावर फिरत असलेल्या बेवारस महिलेला शोधून आणले. ही महिला तिच्या मुलाच्या शोधात वेडी झाली होती. किरण आणि निशांत या दोघांनी या महिलेला ठार मारले आणि तिचा मृतदेह नागेश सावंत यांच्या घराजवळ असलेल्या कडब्याच्या गंजीत ठेवून दिला. त्यानंतर निशांतने रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही कडब्याची गंजी पेटवून दिली. त्यावेळी किरण सावंत अगोदरच घरातून बाहेर पडून जवळच्या डाळिंबाच्या बागेत लपून बसली होती. आग भडकलेली पाहताच परिसरातील ग्रामस्थ आग विजवायला आले . यात निशांत ही सामील होता. त्यावेळी गावकऱ्यांना गंजीच्या आतमध्ये अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह सापडला. या मृतदेहाजवळ किरण सावंत हिचा मोबाईल असल्याने तिनेच स्वत:ला जाळून आत्महत्या केली, असा सगळ्यांचा समज झाला. मात्र, मृतदेहाजवळ सापडलेल्या या मोबाईलमधील सीडीआर रेकॉर्ड पोलिसांनी तपासल्यानंतर या धक्कादायक प्रकरणाचा उलगडा झाला.
Mangalwedha Crime news: किरण सावंतचा नवरा काय म्हणाला?
हा सगळा प्रकार संपल्यानंतर आरोपी महिला किरण सावंत हिचा पती नागेश सावंत याच्याशी 'एबीपी माझा'ने संवाद साधला. नागेश आणि किरण यांना दोन वर्षांची मुलगीही होती. मात्र, किरणने हे सगळे करताना तिचाही विचार केला नाही. आमचं कुटुंब भीतीच्या छायेत आहे. जी घटना झाली आहे, त्यामध्ये आरोपीला आणि सह-आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. किरण आणि निशांत यांच्या प्रेमप्रकरणाबद्दल आम्हाला कोणतीच माहिती नव्हती. निशांत यानेच घरात येऊन कडब्याच्या गंजीला आग लागल्याचे सांगितले. आम्ही आग विझवायचा गेलो तेव्हा आतमध्ये मृतदेह दिसला. तो आमच्याच घरातील असेल, असे आम्हाला वाटले, असे नागेश सावंत याने सांगितले.
Crime News in Maharashtra: मोबाईल फोनच्या सीडीआर रेकॉर्डचा माग काढत गेले अन् पोलिसही चक्रावले
गवताच्या गंजीत किरणचा मृतदेह सापडल्याचा समज झाल्यानंतर सावंत कुटुंबीयांनी पोलिसांना आणि किरणच्या वडिलांना बोलावून घेतले. मात्र, मृतदेह जवळपास जळाल्याने किरणच्या वडिलांना त्याची ओळख पटवता आली नाही. किरणच्या वडिलांनी आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने तपासाला सुरुवात केली. यावेळी पोलिसांना जळालेल्या मृतदेहाजवळ किरण सावंत हिचा मोबाईल फोन मिळाला. हा मृतदेह किरणचा आहे, हे पटवण्यासाठी निशांत-किरण यांनीच मोबाईल फोन महिलेच्या अंगावर ठेऊन दिला होता.
पोलिसांनी या मोबाईलचा सीडीआर रेकॉर्ड काढला तेव्हा त्यामध्ये निशांतचा नंबर दिसून आला. त्यामुळे पोलिसांनी निशांतला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. सुरुवातीला निशांत खरं सांगत नव्हता. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच निशांत याने घडलेल्या प्रकाराची कबुली दिली. त्याच्याच मोबाईलवरुन पोलिसांनी किरणला व्हिडीओ कॉल लावला. व्हिडीओ कॉलवर तिचा चेहरा दिसताच पोलिसांना ती जिवंत असल्याची खात्री पटली. त्यानंतर पोलिसांनी तिला कराड येथे जाऊन ताब्यात घेतले.
आणखी वाचा
























