Man Slits Own Throat : प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याने एका तरुणाने टोकाचं पाऊल उचलत चक्क फेसबुक लाईव्हवर ( Facebook Live ) आत्महत्येचा ( Suicide Attempt ) प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. प्रेयसीचं लग्न दुसऱ्या तरुणासोबत ठरल्याने एका प्रियकराने फेसबुक लाईव्हवर येऊन ग्रायंडर मशीनने स्वत:चा गळा चिरला. हैदराबाद येथील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेयसीने धोका दिल्याने हा तरुण दु:खी होता असं सांगितलं जात आहे. तरुणाला हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पुरंदरपूर पोलीस अधिकारी उमेश कुमार यांनी सांगितलं की, या प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळाली आहे. तरुणाचे नातेवाईक हैदराबादमध्ये पोहोचले आहेत.
उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यातील एक तरुण नोकरीसाठी हैदराबाद येथे राह होता. या दरम्यान त्याच्या प्रेयसीचं लग्न दुसरीकडे ठरल्याने नाराज आणि संतापलेल्या प्रियकराने आधी प्रेयसीला पळून जाऊन लग्न करण्यास सांगितलं. पण प्रेयसीने पळून लग्न करण्यास नकार दिला. यामुळे प्रियकराने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. या तरुणाने फेसबुकवर लाईव्ह येऊन आपल्या मित्रांना परिस्थिती सांगितली आणि ग्रायंडर मशीनने स्वत:चा गळा चिरला. फेसबुक लाईव्हवर ही घटना पाहून मित्रपरिवाराने त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला आणि त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. गंभीर जखमी तरुणावर हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यातील पुरंदरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भगवानपूर टोला आम्हवा येथील शैलेश नावाच्या तरुणाचे गावातील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. शैलेश नोकरीनिमित्त हैदराबादला राहतो. मुलीच्या नातेवाइकांनी तिचे लग्न दुसरीकडे ठरवलं. त्यामुळे शैलेश खूप दु:खी झाला. प्रेमिकेकडून मिळालेला धोका शैलेशला सहन झाला नाही आणि त्याने टोकाचं पाऊल उचलत फेसबुक लाईव्हवर आत्महत्येचा प्रयत्न केला.
आत्महत्येच्या करण्यापूर्वी शैलेशने फेसबुकवर इतरही अनेक पोस्ट टाकल्या आहेत. या पोस्टमध्ये त्याच्या प्रेयसीचे फोटो आणि इतर मेसेज देखील आहेत. मंगळवारी शेवटच्या व्हिडीओमध्ये शैलेश त्याच्या प्रेयसीला शिवीगाळ करताना दिसत आहे. त्यानंतर त्याने टोकाचं पाऊल उचलत ग्रायंडर मशीनने स्वत:चा गळा चिरताना दिसत आहे. जखमी तरुणाला हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचे नातेवाईकही उत्तर प्रदेशहून हैदराबादला पोहोचले आहेत. सध्या शैलेशवर उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी काय सांगितलं?
या प्रकरणी पुरंदरपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख उमेश कुमार यांनी सांगितलं आहे की, या प्रकरणाची माहिती मिळाली आहे. तरुणाचे नातेवाईक हैदराबादला पोहोचले आहेत. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.