Vasai Crime News : कांदिवली येथील  20 वर्षाच्या मुलीवर एकतर्फी प्रेमकरणाऱ्या एका माथेफिरू तरुणाने, आपल्या रस्त्यातील अडथळा दूर करण्यासाठी तरुणीच्या प्रियकराला भाईंदर खाडीवर आणून, बिअर पाजून, सेल्फी घेण्याचे कारण पुढे करून, त्याला भाईंदर खाडीवरून ढकलून देऊन फरार झाला होता. प्रियकराचा मृतदेह हा सडलेल्या अवस्थेत वसई पोलिसांना मिळाला. घटनेचा उलगडा झाल्याने पुरलेला मृतदेह बुधवार 25 मे रोजी पुन्हा बाहेर काढून अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. या घटनेचा गुन्हा हा कांदिवली पोलीस ठाण्यात दाखल असून आरोपीला उत्तर प्रदेश मधून पोलिसांनी अटक केली आहे. 


एकतर्फी प्रेम करणाऱ्या माथेफिरू तरुणाने तरुणीच्या प्रियकराला खाडीवरून ढकलले


दीपक कटकूर (वय 20) असे मृतदेह बाहेर काढलेल्या तरुणाचे नाव आहे. तर सुरज विश्वकर्मा (वय 22) असे आरोपीचे नाव आहे. दीपकच्या प्रेयसीवर आरोपी हा एकतर्फी प्रेम करत होता. आरोपी हा तरुणीच्या नात्यातील आहे. मयत आरोपी आणि 20 वर्षांची तरुणी हे कांदिवली परिसरात एका चाळीत जवळपास राहत होते. पण चाल डेव्हलपमेंटला गेल्याने हे वेगळे झाले होते. तरीही दीपक हा तरुणीला भेटायला जात होता. शेवटी दीपकला बाजूला सारल्याशिवाय आपला नंबर लागणार नाही असे गृहीत धरून 12 मे रोजी आरोपी सुरज ने मयत दीपक याला कांदिवली पूर्व सर्वर हॉटेल येथे बोलावून भेट घेतली. त्याला विश्वासात घेऊन त्याच दिवशी भाईंदर खाडीवर आणून सोबत आणलेली बिअर पाजून, सेल्फी घेण्याच्या बहाण्याने त्याला भाईंदर खाडीत ढकलून देऊन, आपल्या यूपी ला फरार झाला होता. दोन दिवसांनी 14 मे ला सडलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह वसई ब्रह्मपाडा भुईगाव समुद्र किनारी मिळाला होता. शवविच्छेदन अहवाल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने वसई पोलिसांनी त्याचा अंत्यविधी केला होता.  घटनेच्या दिवशीच मयताची मिसिंग कांदिवली पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. 


हत्येचा गुन्हा दाखल


नातेवाईकांच्या संशयावरून पोलीस तपासानंतर हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी संशयित आरोपीचा तपास करून त्याला उत्तर प्रदेश जोनपूर येथून अटक केले असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीच्या कबुली नंतर  बुधवार 25 मे रोजी कांदिवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव सावंत, वसईचे नायब तहसीलदार, पोलीस, डॉक्टर यांच्या समक्ष पुरलेला मृतदेह बाहेर काढून अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिला असल्याचे वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी सांगितले आहे.