Aurangabad Crime News : कधी कोण काय करेल याचा अंदाज घेणं अवघड आहे. अशीच काही करामत औरंगाबादच्या एका जावयाने केली असून त्याने असा काही कहर केला की, संपुर्ण सासरवाडीतील मंडळी हैराण झाली आहे. लग्न झालेले असतानाही या जावयाने बायोकाच्या अल्पवयीन बहिणीला म्हणजेच मेहुणीला सासरवाडीहून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील घोंदलगाव येथील ही घटना आहे. त्यामुळे हैराण झालेल्या सासरवाडीतील मंडळनी थेट पोलिस ठाणे गाठून जावयाची तक्रार केली असून, याप्रकरणी जावयासह त्याच्या साथीदाराविरुध्द वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोंदलगाव येथील एका कुटुंबातील मुलीचे लग्न दीड वर्षापूर्वी तालुक्यातीलच कापूसवाडगाव येथील एकाशी झालं. तालुक्यातीलच सासुरवाडी असल्याने जावयाचे नेहमी येणे-जाणे असायचं. त्यामुळे यावेळी अनेकदा सालीशी गप्पागोष्टी व्हायच्या. पण या अल्पवयीन सालीला हा नखरेल मेहुणा एकेदिवशी पळवून नेईल, याची पुसटशी कल्पनाही कुणाला नव्हती. पण जावयाने जे केलं त्यानंतर सासरच्या मंडळींना सुद्धा धक्काच बसला.


कारण 9 मे रोजी मेहुणा घोंदलगाव येथे सासरवाडीला मुक्कामी आला होता. रात्रीच्या सुमारास जावयासह सर्व कुटुंब जेवण आटोपून झोपी गेले. सकाळी सदरील कुटुंब जागे झाल्यानंतर जावयासह त्यांची अल्पवयीन 17 वर्षीय मुलगी घरातून गायब झालेली त्यांना दिसली. त्यानंतर त्यांनी गावातील नातलगांसह आजूबाजूला दोघांचाही शोध घेतला. परंतु ते सापडले नाही. 


मुलीचा शोध सुरू असतानाच सासरच्या मंडळीना आपल्या जावयाचा फोन आला आणि मी तुमच्या मुलीला रात्री 12 वाजता घेऊन गेल्याच त्यानं सांगताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मुलीला परत पाठवण्यासाठी ऑनलाइन दहा हजार पाठवून देण्याची जावई बापूने मागणी केली. घाबरलेल्या सासरच्या लोकांनी दहा हजार रुपये पटकन फोन पे वर टाकले सुद्धा, पण त्यानंतर सुद्धा मुलगी परत आली नाही. त्यामुळे जावईची नियत फिरली असून, माझ्या मुलीला लग्न करण्याच्या उद्देशानेच जावयाने पळवून नेले असल्याचे वडिलांनी पोलिसांना सांगितले. त्यांनतर याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.