नागपूर : ओडिसातून ट्रेनने नागपुरात येऊन चोरी करून परत इतर राज्यात ऐशोआरमात जीवन जगणाऱ्या एका सराईत चोराला नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. प्रशांत कुमार कराड असे या चोराचे नाव असून प्रशांत कराडच्या नेतृत्वात चोरट्यांच्या आंतरराज्यीय टोळीने नागपुरात एक दोन नाही तर तब्बल 16 ठिकाणी चोऱ्या केल्याचं उघड झाले आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातही प्रशांत आणि त्याच्या टोळीने चोऱ्या केल्या आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून नागपुरच्या प्रतापनगर, बेलतरोडी, जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोऱ्या आणि घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. घरात लोक झोपले असताना देखील चोरीच्या घटना घडत असल्याने उपराजधानीतील कायदा सुव्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. चोरी आणि घरफोडीच्या अनेक तक्रारी येत असल्याने पोलिसांवर देखील चोराला लवकर जेरबंद करण्याचे दबाव वाढला होता. मात्र अनेक प्रयत्न करूनही पोलीस चोरट्यांना जेरबंद करण्यात हतबल ठरत होते.
कसा लागला सराईत चोर पोलिसांच्या हाती?
काही दिवसांपूर्वी प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी दिपाली पातोडे यांनी चोरीची आणखी एक तक्रार दाखल केली. त्याचा तपास करत असताना रात्रीच्या वेळी त्रिमूर्ती नगर परिसरात एका घरात चोर शिरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याच्या घराभोवती शोध सुरू केला असता घरातून पळून जाताना एक संशयास्पद इसम पोलिसांच्या नजरेस पडला. त्याला पकडून पोलिसांनी विचारपूस केली असतां तो उडवाउडवीची उत्तर देत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच त्याने स्वतःचे नाव प्रशांत कुमार कराड असे सांगत चोरीची कबुली दिली.
प्रशांत कराड मूळचा ओडिसामधील गंजम जिल्ह्यातला राहणारा असून तो रेल्वेने ओडिसामधून नागपुरात यायचा. रात्री उशिरा तो मनीष नगर, बेलतरोडी प्रताप नगर, त्रिमुर्ती नगर, स्वावलंबी नगर या परिसरात मोठ्या बंगल्यांमध्ये चोऱ्या करायचा. त्यानंतर प्रशांत पहाटे पुन्हा रेल्वे स्टेशन गाठून रेल्वेने महाराष्ट्राच्या बाहेर निघून जायचा.
कुठे केल्या चोऱ्या?
पोलिसांनी केलेल्या चौकशीत प्रशांत कराड याने नागपुरात तब्बल सोळा घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. त्याशिवाय त्याने ओडिसामधील गंजम आणि भुवनेश्वर जिल्ह्यात तसेच छत्तीसगड आणि तामिळनाडूमध्येही अनेक घरफोड्या केलेल्या आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 971 ग्राम सोन्याचे दागिने जप्त केले आहे.
प्रशांत कराड हा सगळ्या चोऱ्या एकटाच करत असल्याने आजवर त्याची कोणतीही माहिती महाराष्ट्रातील पोलिसांकडे नव्हती. त्याच्या श्रीकांत शेट्टी नावाच्या एका सहकाऱ्याने चोरलेल्या मुद्देमालामधून सोन्याचे दागिने विकण्यास मदत करायचा. प्रशांत कराड घरफोडी करून चोरलेल्या मुद्देमालातून सोन्याचे दागिने श्रीकांत शेट्टीच्या हवाली करायचा आणि त्यानंतर शेट्टी त्यास वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन विकायचा. सोने विकून मिळणाऱ्या रकमेतून दोघे रायपूरमधील एका चांगल्या कॉलनीत घर भाड्याने घेऊन आरामाची जिंदगी जगत होते. प्रत्येक मोठ्या चोरीनंतर महागडी दारू, मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन पंचपक्वान्न खाण्याची दोघांची जीवनपद्धती होती.
पोलिसांनी प्रशांत कडून 971 ग्राम सोन्याचे दागिने असा एकूण 38 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.