बारामती : हनीट्रॅपद्वारे खंडणी वसूल करणाऱ्या टोळीचा बारामतीत पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या आरोपींनी आतापर्यंत 10 ते 12 गुन्हे केले आहेत. विशेष म्हणजे चार जणांना अटक केल्यानंतर हनीट्रॅप घडवून आणणारा मास्टरमाइंड हा मुंबईतील बडतर्फ पोलीस निघाला आहे. बारामती पोलिसांनी एक मोठी हनीट्रॅप करणारी व खंडणी वसूल करणारी टोळी जेरबंद केली आहे. या खंडणीखोर स्मिता दिलीप गायकवाड, आशिष अशोक पवार, सुहासिनी योगेश अहिवळे आणि राकेश रमेश निंबोरे या चौघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. या संदर्भात बारामतीतील महेश्वर अपार्टमेंट येथील कमलाशंकर पांडे यांनी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती. 


यामध्ये फलटण येथील स्मिता गायकवाड हिने तिच्या मोबाईलवरून ओळख निर्माण करून फोटो पाठवून व गोड बोलून गप्पा मारून पांडे यांना फलटण येथे बोलावून घेतले. तिने त्यांना बोलावून घेतल्यानंतर अचानक आशिष पवार व गुरु काकडे नावाच्या दोघांनी येऊन कमलाशंकर पांडे यांना जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच माझी बहीण सुहासिनी येथे असून महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची भीती घातली व 5 लाख रुपये खंडणी मागितली. 


आरोपींमध्ये एका बडतर्फ पोलिसाचा समावेश
या प्रकाराने कमलाशंकर पांडे घाबरून गेले व भीतीपोटी मानसिक तणावाखाली गेले. त्यानंतर त्यांनी आरोपींना 1 लाख रुपये दिले. त्यांनंतर काही दिवसांनी पुन्हा पैशाची मागणी आरोपींनी केली. गुरु काकडे याने खंडणीची उर्वरित रक्कम मागण्यासाठी बारामती बसस्थानकावर येत असल्याचे त्यांना सांगितले. त्यावरून कमला शंकर पांडे यांनी नाइलाजाने बारामती पोलीस ठाणे गाठले. त्यावरून अश्विनी शेंडगे यांनी कमलाशंकर पांडे यांना बोलावून पंच आणि पोलिस कर्मचाऱ्यांचा सापळा रचला आणि उर्वरित रक्कम घेताना या व्यक्तीस त्याच्या ताब्यातील मारुती वॅगनार गाडीसह ताब्यात घेतले. तेव्हा त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो राकेश रमेश निंबोरे असल्याचे निष्पन्न झाले. या राकेश रमेश निंभोरे ते फलटण बारामती शहर पोलीस ठाणे लोणंद पोलीस ठाण्यात मिळून 11 गुन्हे आतापर्यंत केलेले आहेत तर आशिष पवार हा बडतर्फ पोलिस असल्याचे निष्पन्न झाले आहे. आशिष अशोक पवार हा मुंबईतील कुरार पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले. त्यास दोन महिन्यापूर्वी पोलिस ठाण्यातून बडतर्फ करण्यात आले आहे.