LPG Gas Crisis: नाशिकमध्ये गॅस सिलिंडरच्या काळाबाजाराविरोधात (LPG Gylinder Black Market) पुरवठा विभागाने मोठी कारवाई करत तब्बल 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी नाशिकच्या (Nashik) सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station) 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरात गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर सिलिंडरचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने सातपूर पोलिसांसह सातपूर रोडवरील नाईस संकुल परिसरात छापा टाकला. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
LPG Gas Crisis: एकूण 447 सिलिंडर जप्त
या छाप्यात एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर सिलिंडरची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. तपासणीदरम्यान 158 भरलेले आणि 289 रिकामे असे एकूण 447 सिलिंडर जप्त करण्यात आले. याशिवाय दोन छोटे टेम्पो आणि एक मोठा ट्रकही ताब्यात घेण्यात आला. जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाची किंमत सुमारे 25 लाख रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.
LPG Gas Crisis: नाशिकमध्ये पहिला गुन्हा दाखल
गॅस टंचाईचा फायदा घेत सिलिंडरचा काळाबाजार केला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, नाशिकमध्ये या प्रकारातील हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. सातपूर पोलिसांनी जीवनावश्यक वस्तूंच्या काळाबाजारासंदर्भातील कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवत चौकशीला सुरुवात केली आहे.
LPG Gas Crisis: सिलिंडरच्या काळाबाजारावर आळा बसणार?
दरम्यान, संबंधित एजन्सी चालकाने आपण काळाबाजार करत नसून सिलिंडर गोडाऊनमध्ये नेण्यासाठी वाहतूक करत असल्याचा दावा केला आहे. मात्र, पुरवठा विभाग आणि पोलीस या दाव्याची पडताळणी करत असून, या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास सुरू आहे. या कारवाईमुळे गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या गैरप्रकारांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Nashik News: गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये तपासणी मोहीम
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचे रेशनिंग आणि काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गॅस वितरक आणि हॉटेल्सची तपासणी मोहीम सुरू केली आहे. ग्राहकांना बुकिंगनंतर 2 ते 3 दिवसांत सिलिंडर उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले असून, नागरिकांनी एजन्सींवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. इराण-इस्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस वापराबाबत नव्या मार्गदर्शक सूचनांमुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. घरगुती सिलिंडरला प्राधान्य देण्यात आले असून व्यावसायिक वापरावर मर्यादा घालण्यात आल्याने मागणी वाढली आहे. जिल्ह्यातील 135 गॅस वितरकांची तपासणी सुरू असून पहिल्याच दिवशी 12 ठिकाणी पाहणी करण्यात आली. तसेच हॉटेल्समध्येही अचानक तपासण्या सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
आणखी वाचा
